भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 ची (ICC T20 international world cup 2026) शानदार सुरुवात केली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा (USA) पराभव करून आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केला.
या विजयासोबतच टीम इंडियाने एक मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2024 च्या वर्ल्ड कपपासून ते आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हारलेला नाही. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरले होते. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विजेतेपद मिळवले होते. त्या स्पर्धेत भारताने सलग 8 सामने जिंकले होते. आता हाच विजयाचा रथ सूर्यकुमार यादवने पुढे नेला असून, भारताने या वर्षातील आपल्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेला 29 धावांनी धूळ चारली.
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग सर्वाधिक सामने जिंकणारा भारत आता पहिला देश ठरला आहे. भारताने 2024 ते 2026 सलग 9 विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 2022 ते 2024 सलग 8 विजय मिळवले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिका संघाने 2024 च्या स्पर्धेत फायनलपर्यंत सलग 8 विजय मिळवले आहेत. भारतीय संघाकडे आता हा विजयाचा आकडा 10 वर नेण्याची सुवर्णसंधी आहे. सलग 10 सामने जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरू शकतो. भारताचा पुढचा सामना गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी नामिबिया विरुद्ध दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. ज्या प्रकारे टीम इंडिया फॉर्ममध्ये आहे, ते पाहता विजयाची ही मालिका 10 पर्यंत पोहोचवणे कठीण वाटत नाही. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की, हा विक्रम भविष्यात कोणती दुसरी टीम मोडू शकते की भारताचा हा दबदबा असाच कायम राहतो.




