पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ईशान किशनने (Ishaan kishan) विजयाचा पाया रचला. त्याने अवघ्या 40 चेंडूंत 77 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 18.8 षटकांत केवळ 114 धावांवर गारद झाला आणि भारताने 61 धावांनी हा सामना जिंकला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने या विजयासोबतच दोन मोठे जागतिक विक्रम (महारिकॉर्ड) आपल्या नावावर केले आहेत.
भारतीय संघ आता आयसीसी (ICC) स्पर्धेमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकापासून भारताने आतापर्यंत सलग 16 सामने जिंकले आहेत. या बाबतीत भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2007 दरम्यान सलग 15 सामने जिंकले होते.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एखाद्या विशिष्ट संघाला सर्वाधिक वेळा हरवण्याचा विक्रमही भारताने केला आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला 8 वेळा धूळ चारली आहे.





