---Advertisement---

उद्या दिल्लीत होणाऱ्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया

---Advertisement---

दिल्ली। उद्यापासून(3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्मा(Rohit Sharma) भारताचे नेतृत्व करणार आहे.

उद्या दिल्लीत होणाऱ्या टी20 सामन्यासाठी असा असू शकतो 11 जणांचा संभाव्य(predicted XI) भारतीय संघ(Team India)-

सलामीवीर – रोहित शर्मा आणि शिखर धवन

मागील काही वर्षांपासून रोहित आणि शिखर यांची जोडीच मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना दिसली आहे. त्यामुळे उद्याही हे दोघेच सलामीला फलंदाजीसाठी उतरतील.

रोहित सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 4 डावात मिळून 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

मात्र शिखरच्या फॉर्मबाबत भारतीय संघाला चिंता असेल. तो नुकताच विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला होता. मात्र या स्पर्धेत त्याला 7 डावात केवळ एकदाच अर्धशतकी खेळी करता आली. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सप्टेंबरमध्ये झालेल्या टी20 मालिकेत त्याने 40 आणि 36 धावांची खेळी केली होती.

मधली फळी – केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर

विराटच्या अनुपस्थितीत भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल उतरण्याची शक्यता आहे. राहुल सध्या चांगल्या लयीत आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत विजेता संघ कर्नाटककडून चांगला खेळ केला होता. त्याने 11 सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 598 धावा केल्या होत्या.

तसेच कर्नाटकने या स्पर्धेत मनिष पांडेच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले आहे. पांडेही चांगल्या लयीत आहे. त्यामुळे तो उद्या बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 11 जणांच्या भारतीय संघाकडून खेळू शकतो.

त्याचबरोबर श्रेयस अय्यरने भारताकडून मागील काही सामन्यात नियमित खेळताना कामगिरीत सातत्य राखले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असणाऱ्या अय्यरला दिल्लीत खेळण्याचा अनुभवही आहे. त्यामुळे तोही 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.

यष्टीरक्षक – रिषभ पंत

भारताकडे रिषभ पंत आणि संजू सॅमसन असे दोन यष्टीरक्षणासाठी पर्याय आहेत. पण भारतीय संघ रिषभलाच पसंती देण्याची शक्यता आहे. मागील काही सामन्यांपासून रिषभ फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसला आहे. पण तरीही तो यष्टीरक्षक म्हणून भारताची पहिली पसंती असल्याने उद्या तोच यष्टीरक्षण करताना दिसू शकतो.

अष्टपैलू- कृणाल पंड्या

हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत कृणाल पंड्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून जबाबदारी असेल. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही बडोदाकडून चांगला खेळ केला होता. तसेच त्याच्या फिरकी गोलंदाजीचा आणि तळात आक्रमक फलंदाजी करण्याचा भारताला फायदा होऊ शकतो.

गोलंदाज – दिपक चाहर, खलील अहमद, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर

युजवेंद्र चहल उद्यापासून सुरु होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. त्याला भारताच्या मागील काही टी20 मालिकांमध्ये संधी मिळालेली नव्हती.

गोलंदाजांच्या फळीत तो अनुभवी गोलंदाज आहे. तसेच त्याच्या फिरकी गोलंदाजीचा भारतात खेळताना फायदा होऊ शकतो. त्यामुळे तो उद्या होणाऱ्या टी20 सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघाचा भाग असू शकतो.

त्याला साथ द्यायला वॉशिंग्टन सुंदर असेल. सुंदरच्या गोलंदाजीबरोबरच त्याच्या फलंदाजीचाही भारताला फायदा मिळू शकतो.

त्याचबरोबर दिपक चाहर आणि खलील अहमद हे दोन वेगवान गोलंदाज उद्या 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. या दोघांचीही भारताच्या मागील काही टी20 सामन्यांमध्ये कामगिरी चांगली झाली आहे.

चाहरचा इकोनॉमी रेट चांगला असून त्याने भारताकडून खेळलेल्या 4 टी20 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---