---Advertisement---

बापरे, या दुखापती का काय..! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक-दोन नव्हे तब्बल दहा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 12:57 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. एका-नंतर-एक अशा तब्बल १० भारतीय खेळाडूंना या दौऱ्यावर आतापर्यंत दुखापती झाल्या आहेत. कदाचितच आजवर भारतीय संघातील एवढे खेळाडू परदेशी दौऱ्यावर गेल्यानंतर दुखापती झाले असतील. यामुळे येत्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतीय संघापुढे दुखापती खेळाडूंचे बदली खेळाडू शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

वेगवान गोलंदाजी मोठी समस्या

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येऊ शकला नव्हता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत मोहम्मद शमी, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना संघाने दुखापतीमुळे गमावले. त्यांच्याजागी मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या युवा वेगवान गोलंदाजांना खेळवण्यात येत आहे. अशात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने येत्या चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. बुमराहनंतर भारतीय संघाकडे सिराज, सैनी आणि टी नटराजन यांच्या रुपात तीन वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्याकडे बुमराहइतका आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही.

सिडनी कसोटीत पाच प्रमुख खेळाडूंना दुखापती

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ५ प्रमुख भारतीय खेळाडूंना दुखापती झाल्या. यात रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, आर अश्विन, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे व विहारीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. बुमराहच्या ओटीपोटीत ताण आल्याने तोही ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर झाला आहे.

असे असले तरी, दुखापतग्रस्त अश्विन आणि पंत चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही संघ व्यवस्थापनाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.

इतर पाच खेळाडूंही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घायाळ 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळत असताना मनीष पांडे, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांना दुखापती झाल्या होत्या. त्यापैकी राहुल कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता होती. परंतु नेट्समध्ये सराव करत असताना तो जखमी झाल्याने त्याला संघातून बाहेर करण्यात आले.

तत्पुर्वी इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या दौऱ्याआधीच दुखापतग्रस्त असल्याने त्यांची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्याचबरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे वनडे, टी२० मालिकेत आणि कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला नव्हता.

विहारीच्या जागी अगरवाल-साहाला मिळू शकते संधी

विहारीच्या जागी वृद्धिमान साहा याला यष्टीरक्षक म्हणून संघात सहभागी केले जाण्याची दाट शक्यता आहे. किंवा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल याला मधल्या फळीत विहारीच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

जर विहारीच्या जागी साहाला अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान देण्यात आले, तर यष्टीरक्षक रिषभ पंतला फलंदाजाच्या रुपात खेळवले जाऊ शकते. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या डावात पंतने ९७ धावांची आतिशी खेळी केली होती. दरम्यान त्याने ३ खणखणीत षटकार व १२ चौकार ठोकले होते. परंतु पहिल्या डावात झालेल्या दुखापतीमुळे त्याच्याजागी साहाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षण केले होते. यावेळी साहाने यष्टीमागे तब्बल ४ झेल पकडले होते. त्यामुळे साहावर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवून पंतला पूर्णपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते.

जडेजाच्या जागी शार्दुलची निवड

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दुखापतग्रस्त जडेजाच्या जागी शार्दुल ठाकुरला संघात सहभागी करण्यात आले आहे. कसोटी मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात कर्णधार रहाणेने पाच गोलंदाजासह उतरण्याची रणनिती वापरली आहे. अशात वेगवान गोलंदाज ठाकूरला ब्रिस्बेन कसोटीतील अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळू शकते. ठाकुर गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजीही करु शकतो. ठाकुरऐवजी रहाणे युवा गोलंदाज टी नटराजन यालाही आजमावण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विहारी-जडेजा आऊट; तर बुमराह खेळण्याची शक्यता कमी, अशी असेल ब्रिस्बेन कसोटीतील भारताची प्लेइंग XI

धक्क्यांवर धक्के आणि आता वज्रप्रहार.! जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ ‘हा’ खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---