आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघ गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नामीबियाविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan kishan) सराव सत्रादरम्यान जखमी झाला आहे. नेट्समध्ये जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) चेंडू खेळताना त्याला ही दुखापत झाली. इशानची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही.
नामीबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीत सराव सुरू असताना इशान किशन फलंदाजीचा सराव करत होता. यावेळी जसप्रीत बुमराहचा एक वेगवान चेंडू इशानच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर लागला. चेंडू लागताच इशान प्रचंड वेदनेत दिसला, त्यानंतर लगेचच फिजिओ मैदानावर पोहोचले. त्यांनी तपासणी करून पेन रिलीफ स्प्रे लावला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर इशानने पुन्हा सुमारे 5 मिनिटे फलंदाजी केली आणि शेवटी तो बरा असल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, भारतीय संघासाठी एक चांगली बातमी म्हणजे अभिषेक शर्मा आता पूर्णपणे फिट झाला असून त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आजारी होता आणि पोटातील संसर्गामुळे (Infection) त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्याची प्रकृती सुधारली आहे. तिलक वर्माने (Tilak Verma) मीडियाशी बोलताना सांगितले की, अभिषेकला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे, पण तो सामन्यात खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय उद्या (सामन्याच्या दिवशी) घेतला जाईल.






