भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. अशातच अजिंक्यची प्रतिक्रिया समोर येत असून त्याने ऑस्ट्रेलियातील विजय आता घडून गेला असल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र, या सर्व कठीण परिस्थितीतही प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
त्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला असून आता शुक्रवारपासून (5 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्धची 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
याबद्दल अजिंक्य म्हणाला, “टेस्ट चॅम्पियनशिपमधील प्रत्येक मालिका व प्रत्येक सामना अतिशय महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जो विजय मिळवला तो फारच शानदार आहे पण ती घटना घडून गेलेली असून त्याचा जास्त विचार करायला नको.” अजिंक्यने स्पष्ट केले की भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष आगामी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेवर असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अजिंक्यने नेतृत्वासोबतच फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली होती. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यने शानदार शतक झळकावले होते. अजिंक्यने भारताच्या पहिल्या डावात 223 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या . अजिंक्यच्या या खेळीमुळेच भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामना जिंकला व मालिकेत जोरदार पुनरागमन केले.सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असेल की अजिंक्य आगामी मालिकेत देखील याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल.
आगामी काळात इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.
भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG : पहिल्या सामन्यासाठी ठरले भारतीय सलामीवीर, तर यष्टिरक्षक म्हणून मिळाली ‘या’ खेळाडूला संधी
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचले शेतकरी आंदोलन, विराट कोहलीने दिली माहिती
INDvENG : कुठे व केव्हा होणार पहिला कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही