भारतीय महिला कबड्डी संघाची माजी कर्णधार ‘तेजस्विनी बाई’ हिची येत्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
कोण आहेत तेजस्विनी बाई ?
राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून तसेच संघाला बोनस गुण मिळवून देणाऱ्या व अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा ह्या तेजस्विनी बाई.
आपल्या ताकदवार चढाया आणि अप्रतिम बचावाच्या जोरावर त्यांनी अनेक सामने भारताला एकहाती जिंकून दिलेले आहेत.
२०११ साली त्यांना मनाचा ‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
मागील १७ वर्षांपासून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे
आपल्या कारकिर्दीची सुरुवातीचे ३-४ वर्षे त्या कर्नाटक संघाकडून खेळल्या. त्यानंतर मात्र त्या सातत्याने भारतीय रेल्वे संघाकडून खेळल्या. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत रेल्वेचा संघ एकदाही राष्ट्रीय स्पर्धेत पराभूत झाला नाही.
२०१० व २०१४ च्या आशियाई स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे कर्णधार पद भूषविले आणि भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. २०१६ मधील दक्षिण आशियाई स्पर्धा ही त्यांची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.
प्रशिक्षक पदी निवड-
तेजस्विनी बाई हे कबड्डी वर्तुळातील मोठे नाव व इतर महिला खेळाडू त्यांच्याकडे अत्यंत आदराने तसेच आदर्श म्हणून बघतात. त्यांच्या पाठीशी असलेला ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा दांडगा अनुभव’ ही देखील जमेची बाजू आहे.
शिवाय २०१६ पर्यंत त्या भारतीय संघ्याच्या कर्णधार असल्याने सध्याच्या संघातील खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव आहे.
त्यामुळे त्यांना खेळाडूंची बलस्थाने तसेच कमकुवत बाजू चांगल्याच माहिती आहेत.
खेळाडूंच्या दृष्टीने
सध्याच्या संघातील आघाडीच्या खेळाडू अभिलाषा म्हात्रे, प्रियांका नेगी, प्रियांका, कविता, पायल चौधरी, साक्षी कुमारी, रितू नेगी या सर्व खेळाडूंना तेजस्विनी बाईच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्याशी जुळवून घेणे सोईस्कर होईल.
कोणत्याही खेळात उत्कृष्ट असणारा खेळाडू त्या क्षेत्रात उत्तम प्रशिक्षक बनतोच असे नाही. याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. त्यामुळे तेजस्विनी बाईसाठी ही एक नक्कीच आव्हानात्मक जबाबदारी असेल यात काही शंकाच नाही.
त्यामुळे त्या आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून उत्तम संघबांधणी करून आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून देण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा करूया.