प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या चौथ्या दिवशी म्हणजे काल दिनांक १ ऑगस्ट रोजी दुसरा सामना तेलुगू टायटन्स आणि यु.पी योद्धा या झोन बी मधील संघात झाल. या सामन्यात यु.पी योद्धा संघाने तेलगू टायटन्स संघाचा ३१-१८ असा सहज पराभव केला. या विजयामध्ये यु.पी योद्धा संघातील नितीन तोमर, नितेश कुमार आणि राजेश नरवाल हे खेळाडू चमकले.
या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाने संयमी खेळ केला आणि फक्त डू ऑर डाय रेडमध्येच जोखीम उचलले. पहिली रेड या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू असणाऱ्या यु.पी.योद्धा संघाच्या नितीन तोमरने केली आणि एक गुण मिळवला. पहिल्या सत्रात राहुल चौधरीने ४ गुण मिळवले होते. पहिले सत्र संपले तेव्हा तेलुगू टायटन्स संघाचे ११ तर यु.पी. संघाचे १२ गुण होते. दोन्ही संघाचे रेडींगमध्ये ८-८ गुण होते तर डिफेन्समध्ये यु.पी.संघाने ४ गुण मिळवले. तेलगू संघाने डिफेन्समध्ये २ गुण मिळवले आणि त्यांना १२ व्या मिनिटाला एक एक्सट्रा गुण (टेकनिकल पॉईंट) मिळाला होता.
दुसऱ्या सत्रात यु.पी.संघाने सामन्यावर आपले वर्चस्व मिळवले. त्यांनी दुसऱ्या सत्रातील पहिल्या दहा मिनिटात १४-२४ अशी दहा गुणांची भक्कम आघाडी मिळवली. यात सुरेंदर सिंगने सुपर रेड केली आणि सामन्याचा निकाल निश्चित केला. त्यानंतर राहुल चौधरी आणि निलेश साळुंके यांनी तेलगू संघाला सामन्यात परत आणण्याचे अनेक प्रयन्त केले पण सामना त्यांच्या हातून निसटला होता. शेवटी यु.पी संघाने हा सामना ३१-१८ अश्या मोठ्या फरकाने जिंकला. राहुलने तेलगू टायटन्स संघासाठी सर्वाधीक ७ गुण मिळवले तर यु.पी. संघासाठी नितीन तोमरने ६ गुण मिळवले. तेलगू टायटन्स संघावर या पराभवानंतर सलग तीन सामने हरण्याची नामुष्की आली आहे.
हैदराबाद येथे प्रो कब्बडीचा सध्या मुक्काम आहे. तेलुगू टायटन्स या संघाचे हेद्राबाद हे घरचे मैदान आहे त्यामुळे या संघाला येथे दररोज सामना खेळाणे बंधनकारक असते. काल झालेला सामना तेलगू टायटन्स संघासाठीचा या मोसमातील चौथा सामना होता तर यु.पी.योद्धाचा संघ या प्रो कब्बडीच्या इतिहासातील पहिला सामना खेळत होता.