प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या शेवटच्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघानी तुल्यबळ खेळ दाखवला. दुसऱ्या सत्रात देखील गुणांसाठी खूप चढाओढ झाली. हा सामना शेवटच्या मिनिटापर्यंत गेला. शेवटच्या मिनिटात राहुल चौधरी आणि सुरजीत सिंग यांनी एम्प्टी रेड केल्याने हा सामना ३७-३७ असा बरोबरीत सुटला. बेंगालकडून जाँग कुन ली याने ८ गुण मिळवले तर टायटन्सकडून निलेश साळुंकेने ७ गुणांची कमाई केली. या सामन्यात बंगालचा मुख्य रेडर मनिंदर सिंग याला अराम देण्यात आला होता.
पहिल्या सत्रात दोन्ही संघाने डू ऑर डाय रेड वर संघाचे गुणांचे खाते खोलले. सामन्यात ५ मिनिटे झाले तेव्हा दोन्ही संघ ३-३ अश्या बरोबरीवर होते. त्यानंतर बंगालचा संघ सामन्यावर पकड बनवण्यात यशस्वी झाला. सामन्याच्या १० व्या मिनिटाला टायटन्सचा संघ ऑल आऊट झाला आणि बेंगाल संघाने ११-६ अशी आघाडी मिळवली.
डिफेन्स आणि रेडींग या दोन्ही आघाड्यांवर बंगालचा दबदबा कायम राहिला आणि पहिले सत्र संपण्यास ६ मिनिटे बाकी असताना बेंगाल १५-१० असे आघाडीवर होते. परंतु निलेश साळुंकेच्या जबरदस्त रेडींगमुळे बेंगाल ऑल आऊट होण्याचे सावट पसरले. उर्वरित काम राहुल चौधरीने केले आणि १७व्या मिनिटाला बेंगाल ऑल आऊट झाले. पहिले सत्र संपले तेव्हा बेंगाल २०-१७ असे आघाडीवर होते.
दुसऱ्या सत्रात बंगालचा खेळ पुन्हा बहरला. दुसऱ्या सत्रात ५ मिनिटे झाली तेव्हा बेंगाल २४-१८ असे आघाडीवर होते. त्यानंतर सातव्या मिनिटाला टायटन्सचा संघ ऑल आऊट झाला आणि बंगालने ३०-२४ अशी आघाडी मिळवली. ऑल आऊटनंतर टायटन्स संघाने उत्तम खेळ करत सामन्यात परतण्याचे संकेत दिले. दुसरे सत्र संपण्यास ४ मिनिटाने बाकी असताना बेंगाल ऑल आऊट झाली आणि सामन्यात पहिल्यांदा टायटन्स संघाने बढत घेतली. टायटन्स ३६-३४ असे आघाडीवर गेले.
ऑल आऊटनंतर बेंगालने सामन्यात परतण्याचे खूप प्रयन्त केले. शेवटच्या मिनिटात दोन्ही संघ ३७-३७ असे बरोबरीत होते. राहुल चौधरीने एम्प्टी रेड केली आणि त्यानंतर सुरजीतने एम्प्टी रेड केली त्यामुळे हा रोमहर्षक सामना ३७-३७ असा बरोबरीत सुटला.