दक्षिण आफ्रीकेने भारताला कसोटी मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेमध्ये सुद्धा पराभूत केले आहे. पार्ल येथे पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रीकेने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी मिळवली. आता तिसरा आणि शेवटचा सामना २३ जानेवारीला केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.
मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे. तो म्हणाला की, “आम्ही सुपरस्टार्सवर अवलंबून नाही. आम्ही २ सामने जिंकून समाधानी नाही. आमचे लक्ष्य भारताला क्लीन स्वीप करण्याकडे आहे. जर आम्ही असे करण्यात यशस्वी झाले तर ते चांगलेच होईल.”
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमाने त्याच्या संघाची प्रशंसा करत म्हटले आहे की, “माझे असे मत आहे की, आमच्या संघाच्या यशाचे एकमेव कारण आहे की आमचे खेळाडू मैदानात एकमेकांसाठी लढतात. ही मालिका जिंकल्यामुळे मी आनंदी आहे. हे आमचे पहिल्यापासुनचे ध्येय होते. पण दोन सामन्यांतच आम्ही हे ध्येय गाठू असे वाटले नव्हते. एक संघ म्हणून जिकण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सुपरस्टार किंवा एक-दोन खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनांवर अवलंबून नाही.”
तसेच, बवुमाने क्विंटन डि कॉकचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, “क्विंटनचे पुनरागमन संघासाठी चांगले आहे. त्याने आम्हाला पुन्हा तो मौल्यवान खेळाडू का आहे? याची आठवण करुन दिली आहे. मला वाटते की, एक संघ म्हणून आमचा आमच्या क्षमतेवर विश्वास आहे.”
दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेले २८८ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने ४८.१ षटकांमध्ये पूर्ण केले. डि कॉकने या सामन्यात ६६ चेंडूत ७८ धावांची शानदार खेळी खेळली आहे. त्याला या मालिकेत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बवुमाने ३६ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने डिकॅाक बाद झाल्यानंतर जानेमन मलानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची शानदार भागीदारी केली. जानेमन मलानने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. ऐडन मार्करम आणि रॅसी व्हॅन डर डुसेन हे दोघे प्रत्येकी ३७ धावांवर नाबाद राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-






