आयपीएल २०२१ च्या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली आहे. यात परदेशी खेळाडू कोट्याधीश झालेच, यासोबतच प्रथम श्रेणीतील युवा खेळाडूंवरही कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. आयपीएल २०२१ च्या लिलावात अशाही खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यांचे नाव अजुनपर्यंत कोणालाही माहीत नव्हते. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘चेतन सकारिया’. सौराष्ट्रसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या २३ वर्षीय चेतन सकारिया याला राजस्थान रॉयल्स संघाने १.२० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. चेतन डाव्या हाताचा जलद गोलंदाज आहे. २०२० आयपीएल सत्रात त्याने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघासाठी नेट बॉलरची भूमिका बजावली होती. आता तो आयपीएल २०२२ साठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग झाला आहे. दिल्लीने त्याच्यावर आयपीएल २०२२ मेगा लिलावात ४.२ कोटी रुपयांची बोली लावली होती. याच चेतन सकारियाचा आज २३ वा वाढदिवस आहे. २८ फेब्रुवारी १९९८ रोजी भावनगर येथे त्याचा जन्म झाला होता.
या खास दिनानिमित्त जाणून घेऊया, त्याची जीवनकहाणी…
वडील होते टेम्पो चालक
आयपीएल लिलावात कोट्यधीश झालेल्या चेतन सकारिया याचा आतापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. गुजरातच्या वरतेजमध्ये राहणाऱ्या चेतनच्या भावाने गेल्यावर्षी आत्महत्या केली होती. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याचे वडील टेम्पो चालवत असे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी चेतनच्या घरात टी.व्ही. नसल्यामुळे तो आपल्या मित्रांच्या घरी जाऊन सामने पाहत असे. अशातच लिलावात निवड झाल्याचे ऐकून तो थोडा भावूक झाला होता. तसेच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत होता.
चेतनने आयपीएल २०२१ हंगामात चांगले प्रदर्शन करत सर्वांची वाहवा देखील मिळवली. तसेच त्याने २०२१ वर्षात भारतीय संघात देखील पदार्पण केले. पण त्याच्यासाठी २०२१ हे वर्ष जसे आनंदाचे होते, तसेच दु:खाचे देखील होते. वर्षाच्या सुरुवातीलाच भावाला गमावलेल्या चेतनने काही महिन्यातच वडीलांना देखील गमावले. कोविड-१९ मुळे त्याच्या वडीलांचे निधन झाले.
भाऊ असता तर खुश झाला असता
गेल्यावर्षी चेतनच्या भावाने आत्महत्या केली होती. यावर चेतन भावूक होऊन म्हणाला होता, “माझ्या भावाने जानेवारी महिन्यात आत्महत्या केली होती. जेव्हा त्याने हे पाऊल उचलले त्यावेळी मी घरी नव्हतो. त्यावेळी मी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी खेळत होतो. मला ही गोष्ट तोपर्यंत माहीत नव्हती जोपर्यंत मी घरी आलो नव्हतो. कुटुंबीयांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती. तो आता असता तर खूप खुश झाला असता.”
रविंद्र जडेजाच्या सल्ल्याने कारकिर्द लावली मार्गी
आयपीएल निवडीनंतर चेतनने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले होते. भारताचा प्रमुख अष्टपैलू व सौराष्ट्राचा वरिष्ठ खेळाडू रवींद्र जडेजा याच्या एका सल्ल्यामुळे आपले आयुष्य बदलले असे, चेतनने म्हटले होते.
यासंबंधीची आठवण सांगताना तो म्हणाला होता की, “सन २०१७-२०१८ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यातून मी पदार्पण केले. जड्डू भाई या सामन्यात दुखापतीमुळे खेळत नव्हता. सुरूवातीची काही षटके माझ्याकडून मनासारखी गोलंदाजी झाली नाही. माझ्या चेंडूचा टप्पा व्यवस्थित पडत नव्हता. तेव्हा दुखापत असतानाही, जड्डू भाई मैदानात आला आणि मला म्हणाला, मी समजू शकतो तुझ्या पहिल्या सामन्यामुळे तू दबावात असतील. तू खराब कामगिरी केली तर जास्तीत जास्त संघाबाहेर जाशील. मात्र, आता तू मैदानात आहेस आणि त्यामुळे आता शांतचित्ताने गोलंदाजी कर. त्याच्या या सल्ल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी दोन बळी मिळवले.”
चेतन सकारियाची क्रिकेट कारकिर्द
तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने पुढे येत चेतनने अगदी कमी वयात सौराष्ट्राच्या संघात आपली जागा कमावली आहे. स्विंग गोलंदाजी करण्यात माहीर असणाऱ्या चेतनने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी सामन्यात ४४ तर, ३८ टी२० सामन्यात अवघ्या ७.५६ इतक्या इकॉनॉमी रेटने ५१ बळी आपल्या नावे केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: मोहन बागान विजयी ट्रॅकवर; प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम
टीम इंडियाच्या ‘या’ तीन खेळाडूंचं दिनेश कार्तिकने केलं कौतुक; म्हणाला, ‘शोधापेक्षा कमी नाहीत…’