मेलबर्न। भारताचा उद्यापासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरु होणार आहे.
या सामन्यात विजय मिळवून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. याआधी अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने तर पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.
पर्थ कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. त्याप्रमाणे विराटला मेलबर्न कसोटीतही अनेक दिग्गजांच्या मोठ्या विक्रमांना मागे टाकण्याची संधी आहे.
तो मागील काही वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने जानेवारीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 286 धावा, ऑगस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध 593 धावा केल्या आहेत.
मेलबर्न कसोटीत विराटला हे खास विक्रम करण्याची आहे संधी –
– विराटने जर या सामन्यात 181 धावा केल्या तर तो एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. त्याने आत्तापर्यंत यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2653 धावा केल्या आहेत. एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. त्याने 2005 मध्ये 2833 धावा केल्या होत्या.
– विराटने जर या कसोटी मालिकेत शतक केले तर ते त्याचे 2018 मधील एकूण 12 वे शतक ठरेल. तसेच जर त्याने हे शतक केले तर तो एका वर्षात सर्वाधिक शतके करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी करेल. सचिनने 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 शतके केली होती. कोहलीने यावर्षी कसोटीत 5 आणि वनडेत 6 शतके केली आहेत.
– जर विराटने मेलबर्न कसोटीत शतक केले तर तो सुनील गावसकरांच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 8 कसोटी शतकांचीही बरोबरी करेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतके करण्याच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत गावसकरांसह दुसरे स्थान मिळवेल. या यादीत अव्वल स्थानावर 11 शतकांसह सचिन आहे.
-विराटने या सामन्यात 82 पेक्षा अधिक धावा केल्या तर तो राहुल द्रविडच्या एका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या विक्रमाला मागे टाकेल. कसोटीमध्ये परदेशात एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत 1137 धावांसह अव्वल क्रमांकावर द्रविड आहे. त्याने 2002 मध्ये हा पराक्रम केला होता. विराटने यावर्षी कसोटीत परदेशात खेळताना 1065 धावा केल्या आहेत.
-विराटला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या एका वर्षात परदेशात कसोटीमध्ये कर्णधार म्हणून केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकण्याचीही संधी आहे. त्यासाठी विराटला 156 धावांची गरज आहे. स्मिथने 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना परदेशात 1212 धावा केल्या होत्या.
– त्याचबरोबर विराटने या 156 धावा केल्या तर तो परदेशात एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही करेल.
-विराटने मेलबर्न कसोटीत शतक केले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत गॅरी सोबर्स यांच्या 26 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी करेल. त्याचबरोबर सोबर्स यांच्यासह संयुक्तरित्या या यादीत 13 वे स्थान मिळवेल. या यादीत 51 शतकांसह सचिन अव्वल क्रमांकावर आहे.
-विराटने जर मेलबर्न येथे होणाऱ्या या कसोटी सामन्यात शतक केले तर हे त्याचे ऑस्ट्रेलिया विरुद्धचे ऑस्ट्रेलियन भूमीतील कर्णधार म्हणून केलेले 5 वे शतक असेल. त्याचबरोबर तो विंडीजचे महान माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांच्या पाहुण्या संघाच्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियन भूमीत सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या विक्रमाला मागे टाकेल. लॉइड यांनी 4 शतके केली आहेत.
– ऑस्ट्रेलियन भूमीत पाहुण्या संघाच्या कर्णधाराने कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी विराटला 123 धावांची गरज आहे. सध्या या यादीत अव्वल क्रमांकावर 1301 धावांसह क्लाइव्ह लॉइड आहेत. तर ग्रॅमी स्मिथ 748 धावांसह दुसऱ्या आणि आर्ची मॅकलारेन 709 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत कर्णधार म्हणून 626 धावा केल्या आहेत.
-भारताने जर या कसोटीत विजय मिळवला तर विराट आशिया खंडाबाहेर भारतीय कर्णधाराने कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. विराटने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून आशिया खंडाबाहेर 5 कसोटी विजय मिळवले आहेत. तर गांगुलीने 6 कसोटी विजय मिळवले आहेत.
-विराटने जर या सामन्यात शतक केले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकत तिसरे स्थान मिळवेल. सध्या या यादीत विराट आणि संगकारा 63 शतकांसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर 100 शतकांसह सचिन तेंडुलकर आणि दुसऱ्या क्रमांकावर 71 शतकांसह रिकी पॉटिंग आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही?
–चाहत्यांचा हल्लाबोल, रिषभ पंतबद्दलचा तो चुकिचा ट्वीट आयसीसीला भोवला
–टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे एक चांगला कर्णधार होऊ शकतो