नवी दिल्ली | लाल मातीचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी (9 ऑक्टोबर) डिएगो श्वार्टझमेनविरुद्ध उपांत्य सामन्यात सलग सेटमध्ये विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमनकडून नदालला एक चांगले आव्हान मिळाले. मात्र नदालने 6-3, 6-3, 7-6 (7-0) ने सामना जिंकून फ्रेंच ओपनमध्ये 13 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत त्याचा सामना रविवारी(11 ऑक्टोबर) अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचशी होणार आहे. जोकोविचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टीफानोस त्सित्सिपासला उपांत्यफेरीत 6-3,6-2,5-7,4-6,6-1 असे 5 सेटमध्ये पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंतिम सामना द्वितीय मानांकित नदाल जिंकला तर तो दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररच्या 20 ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या विक्रमाचीही बरोबरी करेल. तसेच नदालचा फ्रेंच ओपनमधील हा 100 वा विजय देखील ठरेल. आत्तापर्यंत त्याने फ्रेंच ओपनमध्ये 99 सामने जिंकले आहेत.
फ्रेंच ओपनमधील नदालची सध्या विजय-पराजयाची आकडेवारी 99-2 असा आहे. येथे उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात तो कधीही पराभूत झालेला नाही . मागील दोन आठवड्यात त्याने सर्व 15 सेट जिंकले परंतु श्वार्टझमन विरूद्ध त्याला थोडा संघर्ष करावा लागला. पहिल्या सेटमध्ये नदालने आपली सर्व्हिस गमावली आणि तीन वेळा ब्रेक पॉईंट्सची बचत केली. त्याने फ्रेंच ओपनमध्ये खेळलेल्या मागील 12 उपांत्य फेरीत पहिला सेट कधीही गमावला नाही. यावेळीही त्याने हा विक्रम कायम ठेवला.