रावळपिंडीमध्ये सर्व तयारी झाली होती. मैदान सज्ज होते. किंतु सामना सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडने त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर पाच टी -२० आंतरराष्ट्रीय सामनेही होणार होते. मात्र, न्यूझीलंड संघाने म्हटले आहे की, त्यांच्या संघाच्या सुरक्षेला धोका होता, म्हणून मालिका रद्द करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, न्यूझीलंड संघ आज, १८ सप्टेंबर रोजी घाई घाईत आपल्या देशाकडे उड्डाण करेल. बरं, एखाद्या संघाला दहशतवाद्यांच्या कारवायांचा धोका वाटण्याची ही पहिली वेळ नाही. आज आपण अशाच काही वेदनादायक घटनांबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे क्रिकेटवर परिणाम झाला होता.
२००२, पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा
पाकिस्तानमध्ये न्यूझीलंडला धोका वाटण्याची ही पहिलीच वेळ नाही. कराची येथे न्यूझीलंड संघाच्या हॉटेल बाहेर बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी एकूण १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हा कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नव्हती पण संघाचे फिजिओ डेल शॅकल यांच्या मनगटावर काचेच्या उडत्या तुकड्याने जखम केली होती, ज्यामुळे त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या.
१९८७ आणि १९९२, न्यूझीलंडचा श्रीलंका दौरा
साल १९८७ आणि १९९२ मध्येही न्यूझीलंड संघ अडचणीत आला होता. त्यावेळी तीन कसोटी सामन्यांची मालिका चालू होती. त्यानंतर कोलंबोत संघाच्या हॉटेलजवळ बॉम्बस्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने हैराण झालेल्या न्यूजीलंड संघाला पहिल्या कसोटीनंतर मालिका रद्द करावी लागली. अशीच एक घटना पाच वर्षांनंतर १९९२ मध्ये घडली. त्यानंतरही न्यूझीलंडला श्रीलंका दौरा सोडून मायदेशी परतावे लागले.
२००९, श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा
३ मार्चला क्रिकेटमधील काळा दिवस म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या दिवशी पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. लाहोरमधील गद्दाफी क्रिकेट स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी संघाच्या बसवर हल्ला केला. या घटनेत श्रीलंकेचे सहा सदस्य कुमार संगकारा, जयवर्धने, थिलान समरवीरा आणि थरंगा परानाविथाना जखमी झाले. या घटनेचा खूप वाईट परिणाम पाकिस्तान क्रिकेटवर झाला, एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबले. ऑक्टोबर २०१७ मध्ये श्रीलंकेच्या संघाने पुन्हा पाकिस्तान दौऱ्यासाठी धैर्य गोळा केले आणि गद्दाफी स्टेडियमवरच एक टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
भारतातही पाकिस्तानच्या दहशती कारवाया
२६/११ चे हल्ला आठवला की प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कालवाकालव होते. त्यावेळी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईला लक्ष्य केले होते. अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. हा दहशतवादी हल्ला क्रिकेट संघावर किंवा क्रिकेटपटूंवर झाला नसला तरी सात सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आलेल्या इंग्लड संघाने परतणे योग्य मानले. ५-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला क्लीन स्वीप करण्याची सुवर्णसंधी होती. पण नंतर इंग्लड संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी परतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
चौतीस वर्षीय रोहितनंतर ‘या’ युवकांवर असेल टीम इंडियाची मदार, रांगेत एकाहून एक बहाद्दर शिलेदार
भारताच्या टी२० विश्वचषकात अदलाबदलीची शक्यता, आयपीएल प्रदर्शनावर अवलंबून असेल ‘या’ खेळाडूंचं नशीब