ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे स्वरूपचंद हालोजी थळे सुवर्ण चषक पुरूष/ महिला प्रीमियर कबड्डी स्पर्धेचे आयोजन मित्तल स्पोर्टस अकॅडमीने केले आहे. ही स्पर्धा १९ मार्च ते २६ मार्च २०१८ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, कशेळी या मैदानात रंगणार आहे.
या स्पर्धेमध्ये पुरूषांचे १२ तर महिलाचे ६ संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील पुरूषामध्ये प्रथम, व्दितीय श्रेणीतील तसेच कुमार गटातील खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.
यासाठी संघाचा लिलाव ठाण्यामध्ये होणार असून त्यात पुरूष संघासाठी एक लाख रूपये व महिला संघासाठी ५० हजार रूपये ही किमंत प्रत्येक संघ मालकाला देण्यात येणार आहे. त्यापैकी संघ मालकाला त्याच्या एका आवडीच्या खेळाडूस पुरूष खेळाडूस दहा हजार तर महिला खेळाडूस पाच हजार रूपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या लिलावाकरीता संघ मालकाने पुरूष प्रथम संघातील खेळाडूस पाच हजार, व्दितीय संघातील खेळाडूस तीन हजार व कुमार संघातील खेळाडूस दोन हजार रूपयांपासून बोली सुरू करण्याचे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मालकांना पुरूष संघासाठी नव्वद हजार तर महिला संघासाठी ४५ हजार रुपयांपर्यतची रक्कम वापरता येणार आहे.
यात पुरूष संघासाठी सात प्रथम, दोन व्दितीय तर एक कुमार श्रेणींमधील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघातील दहापैकी पहिल्या सात खेळाडूमध्ये प्रथम श्रेणीचे पाच, व्दितीय व कुमार यांचे प्रत्येकी दोन खेळाडू असणार आहे.
हि स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येणार असून त्यात प्रथम साखळी व नंतर बाद पध्दतीने सामने होणार आहे. या स्पर्धेत पुरूष संघातील प्रथम क्रमांकाला १,११,१११ रुपये व सुवर्ण चषक, दुसर्या क्रमांकाला ५५,५५५ रुपये व चषक देण्यात येणार आहे.
दररोजच्या उत्क्रूष्ठ खेळाडूस ५,५५५ रुपये तर मालीकावीरास मोटार सायकल देण्यात येणार आहे. महिला संघातील प्रथम क्रमांकास ५५,५५५रुपये व सुवर्ण चषक, दुसर्या क्रमांकास २५,५५५ रूपये व चषक तर उत्क्रूष्ठ खेळाडूस ३,३३३ रुपये व मालिकावीरास मोटार सायकल देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक तसेच फायनल डे बंपर लकी ड्रा मोटर सायकल देण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस शशिकांत ठाकूर स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष गुरूनाथ म्हात्रे यांनी दिली.