चेन्नई । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला सामना काल भारताने २६ धावांनी जिंकला. हा सामना काल एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक येथे झाला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पहिल्या काही विकेट्स गेल्यावर चांगलाच अंगलट आल्याचे लक्षात आले.
परंतु धोनी आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला सामन्यात २८२ धावांचे लक्ष देण्यात आले. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे त्यांना २१ षटकांत केवळ १६४ धावा करायच्या होत्या. एकप्रकारे हे एक सोपं लक्ष ऑस्ट्रेलियासाठी होते.परंतु त्यांना केवळ ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारता आली.
फक्त विराट नव्हता करत काळजी
जेव्हा सामना ५० वरून २१ षटकांचा करण्यात आला तेव्हा सर्वांना वाटत होते की ऑस्ट्रेलिया आरामात सामना जिंकेल. परंतु कर्णधार विराट कोहलीला याची अजिबात काळजी वाटत नव्हती. कारण आपल्या संघाकडे भुवनेश्वर, जसप्रीत, हार्दिक, कुलदीप आणि यजुवेंद्र चहल सारखे चांगले गोलंदाज होते. हे खेळाडू टी२० मध्ये अतिशय चांगली कामगिरी करतात. त्यामुळे आपण हा सामना सहज जिंकू असे विराटने सामना संपल्यावर सांगितले.