क्रिकेटपटूंचे जग हे खूप रोमांचकारी असते. वेगवेगळ्या देशांतील क्रिकेट दौऱ्यांमुळे त्यांना विमान प्रवासाचा आनंद लुटता येतो. परंतु, कधी-कधी या विमान प्रवासादरम्यान अशा घटना घडतात, ज्यांचा कुणाला विचारदेखील करवणार नाही. २०१६ साली ब्राझील फुटबॉल संघातील खेळाडूंनी भरलेले विमान कोलंबियामध्ये क्रॅश झाले होते. त्यामुळे खेळाडूंचा मृत्यू झाला होता. अशीच एक दुर्घटना एका क्रिकेट संघाबाबतही घडली होती. क्रिकेटपटूंनी भरलेले एक जहाज भयानक समुद्री वादळामध्ये अडकले होते. दरम्यान क्रिकेटपटूंव्यतिरिक्त ११४ लोकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. 10 December 1892 is the Tragic Day For Hong Kong Cricket
१८४१ साली हाँग काँग क्रिकेट संघाने त्यांचा पहिला क्रिकेट सामना खेळला होता. त्यानंतर जवळपास १० वर्षांनंतर हाँग काँगने हाँग काँग क्रिकेट क्लबच्या नावाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी आशियात खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना ‘इंटरपोर्ट मॅच’ म्हटले जात असायचे. या इंटरपोर्ट मॅचमध्ये आशियातील छोटे छोटे संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळत असायचे. हाँग काँग, सीलॉन (श्रीलंका), मलेशिया, शंघाई, सिंगापुर असे आशियाई संघ यामध्ये सहभागी होत असायचे. १९४८ पर्यंत इंटरपोर्ट मॅच खेळले गेले.
इंटरपोर्ट मॅचमधील पहिला सामना १८६६ साली हाँग काँग क्रिकेट क्लब विरुद्ध शंघाई संघात खेळला गेला होता. त्यानंतर १८९२ला पुन्हा हाँग काँग क्रिकेट क्लब आणि शंघाई संघ आमनेसामने आले. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची मालिका खेळली गेली. फेब्रुवारी १८९२ला हाँग काँगमध्ये पहिल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शंघाई संघ हाँग काँगला पोहोचला होता. तो सामना हाँग काँगने एका डाव आणि १३२ धावांनी जिंकला होता. हाँग काँगच्या विजयात कर्णधार जॉन डून यांचे मोठे योगदान होते. जॉन यांच्या शतकी खेळीमुळे पहिल्या डावातच हाँग काँगने ४२९ धावांचा मोठा स्कोर केला होता. शंघाई संघ पहिल्या आणि दूसऱ्या डावात अनुक्रमे १६३ आणि १३४ धावा करु शकला आणि त्यांनी मोठ्या फरकाने तो सामना गमावला.
त्यानंतर ऑक्टोबर १८९२ला मालिकेतील दूसरा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी हाँग काँग हा संघ शंघाईला गेला होता. त्या सामन्यात त्यांनी खूप खराब प्रदर्शन केले. दोन्ही डावात हाँग काँग संघ ७८ आणि ७९ धावा करत सर्वबाद झाला. परिणामत: शंघाई संघाने तो सामना जिंकला.
अत्यंत वाईट प्रदर्शनानंतर हाती आलेल्या पराभवाचे दुख: मनात घेऊन हाँग काँग संघातील खेळाडू मायदेशात परतण्यासाठी ८ ऑक्टोबर १८९२ला एसएस बोखारा नावाच्या जहाजामध्ये बसले. त्यावेळी हे जहाज समुद्राद्वारे प्रवास करण्यासाठी प्रसिद्ध होते. ८ ऑक्टोबरला निघालेल्या या जहाजाला हाँग काँगद्वारे कोलंबो आणि बॉम्बेला जायचे होते. जहाजात हाँग काँग संघातील खेळाडूंसह एकूण १४८ लोक होते. ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबरचा प्रवास चांगला गेला.
मात्र, १० ऑक्टोबर १८९२ची रात्र जहाजावरील सर्वांसाठी खूप भयानक होती. त्या काळ्या रात्रीत मोठे समुद्री वादळ आले आणि वादळात एसएस बोखारा हे जहाज फसले. समुद्री लाटा इतक्या भयानक होत्या की जहाजाचा कॅप्टन जहाजाला सांभाळू शकला नाही आणि बघता बघता पूर्ण जहाज पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत केवळ २३ लोक आपले जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. त्या २३ जिवंत लोकांमध्ये २ लोक असे होते, जे हाँग काँग क्रिकेट क्लबचे सदस्य होते.
या दुर्घटनेनंतर १८९७पर्यंत कोणतीही इंटरपोर्ट सीरीज खेळली गेली नाही. त्यानंतर जेव्हा या मालिकेची सुरुवात झाली तेव्हापासून विजेत्या संघाला हाँग काँग क्रिकेटपटूंना श्रद्धांजली म्हणून बोखारा बेल मेमोरियल ट्रॉफी देण्यात आली. १० ऑक्टोबर १८९२ हा दिवस हाँग काँग क्रिकेटमध्ये काळा दिवस म्हणून आठवला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
निवृत्तीच्या ६ महिन्यांनंतर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी ‘हा’ भारतीय खेळाडू सज्ज
गौतम गंभीरच्या मते पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने केलेली ‘ही’ खेळी सर्वात स्पेशल
आयपीएलमुळे भारतात होणाऱ्या विश्वचषकात इंग्लंडच्या या खेळाडूला होणार फायदा, स्वत:च केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
३ असे भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये खेळले हे अनेकांना माहितीही नसेल…
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल