महाराष्ट्र प्रिमीयर लीगच्या (MPL) तिसऱ्या हंगामाला 4 जूनपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 4 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे. याच काळात वुमेन्स महाराष्ट्र प्रिमीयर लीगला (WMPL) देखील सुरुवात होत आहे. WMPL 5 जून ते 14 जून या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र प्रिमीयर लीगमध्ये प्रत्येक संघाला 10 सामने खेळण्याची संधी
यावर्षी महाराष्ट्र प्रिमीयर लीगमध्ये 6 संघ सहभागी होत असून प्रत्येक संघाला साखळी फेरीत तब्बल 10 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा रॉयल्स, रायगड वॉरियर्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे ते 6 संघ असणार आहेत. 2023 साली रत्नागिरी जेट्स संघाने पहिले वाहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर गतवर्षीचे विजेते देखील जेट्सचं ठरले होते. स्पर्धेत काही दिवस 1, काही दिवस 2 तर काही दिवस 3 सामने होणार आहे. साखळी फेरीचे सामने हे 4 ते 19 जून दरम्यान होतील तर 20 जून क्वॉलीफायर 1 व एलिमीनेटरचे सामने होतील. 21 जून रोजी क्वॉलीफायर 2चा सामना होईल. 22 जून रोजी फायनलचा सामना होईल.
देशातील पहिलीच महिलांसाठी लीग
WMPL ही देशातील कोणत्याही राज्य संघटनेने सुरु केलेली महिलांसाठी पहिलीच लीग आहे. एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घेत ही लीग सुरु केली. या लीगचे साखळी फेरीचे सामने 5 जून ते 12 जून दरम्यान होतील तर 14 जून रोजी महा अंतिम सामना होईल. या लीगमध्ये रत्नागिरी जेट्स, पुणे वॉरियर्स, सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड रॉयल्स हे संघ खेळताना दिसतील. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 6 सामने खेळायला मिळणार आहेत.
दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार
ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, अर्शिन कुलकर्णी, राजवर्धन हंगरगेकरसारखे दिग्गज खेळाडू MPLमध्ये खेळताना दिसतील तर WMPLमध्ये स्म्रिती मंधाना, तेजल हसबनीस. ईश्वरी अवसरेसारख्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंचा सहभाग असणार आहे.
सामने पहाण्यासाठी प्रवेश मोफत
प्रेक्षकांना या स्पर्धेचे सर्व सामने पहाण्यासाठी प्रवेश मोफत आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे सामने होत आहे. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रेक्षकांनी जागतिक दर्जाच्या स्टेडियमवर सामन्यांचा जास्तीत जास्त आनंद घेण्याचे आवाहन यापुर्वीच एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केले आहे.






