Tom Bruce: 34 वर्षीय टॉम ब्रूसने आता न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सोडून स्कॉटलंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो ऑगस्ट महिन्याच्या शेवटी स्कॉटलंडच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. स्कॉटलंडचा क्रिकेट संघ 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कॅनडा टप्प्यातील क्रिकेट वर्ल्ड लीग-2 मध्ये सहभागी होईल. ब्रूसचे वडील स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गमध्ये जन्मले होते, त्यामुळे ब्रूसला स्कॉटलंडकडून खेळण्याची पात्रता मिळाली आहे. (New Zealand to Scotland player switch)
टॉम ब्रूसने 2014 पासून न्यूझीलंडसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सच्या संघाकडून खेळायला सुरुवात केली होती आणि चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्याने न्यूझीलंड संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2020 मध्ये शेवटचा सामना खेळला. त्याने न्यूझीलंड संघासाठी 17 टी20 सामन्यांमध्ये 279 धावा केल्या, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 59 होती. (This was the performance for New Zealand)
टॉम ब्रूसने सांगितले की, “माझ्या कुटुंबाचा स्कॉटिश संघाशी जुना संबंध आहे. मला खात्री आहे की मी स्कॉटलंडकडून खेळणार असल्याचा त्यांना अभिमान वाटेल. 5 वर्षांपूर्वी मला न्यूझीलंड संघासाठी खेळण्याचे भाग्य मिळाले. आता मला जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत राहायचे आहे आणि स्कॉटलंड संघाला मदत करायची आहे. 2016 मध्ये मी काही काळासाठी या संघासोबत होतो आणि तो अनुभव चांगला होता. मी स्कॉटलंडच्या अनेक सध्याच्या खेळाडूंसोबत आणि त्यांच्या विरुद्ध खेळलो आहे.” (Tom Bruce Statement)
टॉम ब्रूसने 2015-16च्या सुपर स्मॅशमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी 140.25च्या स्ट्राइक रेटने 223 धावा करून सर्वांना प्रभावित केले होते. या दमदार कामगिरीनंतरच त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. तो नुकताच प्रोविडेंस, गयाना येथे ग्लोबल सुपर लीगमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी खेळला होता. स्कॉटलंड पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक डग वॉटसन (Doug Watson) यांनी सांगितले की, “टॉम या ग्रुपमध्ये सामील झाल्यामुळे मी खूप उत्साहित आहे. तो फक्त एक जागतिक दर्जाचा खेळाडूच नाही, तर त्याच्याकडे प्रचंड अनुभवही आहे.” (Tom Bruce Statement)






