मुंबई। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-पुणे यांच्या विद्यमाने दि. ५ ते ८ मे २०२२ या कालावधीत “४८व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करण्यात येणार आहे. साई चौक मैदान, मोझे कॉलेज जवळ, बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या या स्पर्धेकरिता मातीची सहा क्रीडांगणे तयार करण्याचे त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरी व इतर कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दोन्ही गटातील खेळाडूचे वय २० वर्षाच्या आत म्हणजे जन्म तारीख ३१ मार्च २००२ किंवा त्यानंतरची असावी. कुमार गटासाठी वजन ७० किलो, तर कुमारी गटासाठी वजन ६५ किलोच्या आत असावे. जन्म तारखेचे पुरावे मूळ प्रतिसह सादर करणे आवश्यक आहे.
सर्व संलग्न जिल्हा संघटनांनी आपल्या खेळाडूंची ऑन-लाईन नोंदणी करण्याबरोबरच स्पर्धा प्रवेश अर्ज दि. २ मे २०२२पूर्वी ऑन-लाईन भरणे बंधनकारक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची वजन व वयोमर्यादेची छाननी दि. ५ मे रोजी सकाळपासून करण्यात येईल.