पुणे। देशभरातील युवा खेळाडूंची विविध खेळांतील चढाओढ असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा रविवारी (दि.२०) म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत दुपारी १२ वाजता होणार आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्समध्ये यश मिळविलेल्या संघ आणि खेळाडूंना सर्वसाधारण विजेतेपद व इतर पारितोषिके समारोप सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
बॅडमिंटन हॉलमध्ये होणा-या समारोप सोहळ्याला राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, स्थानिक आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.
देशभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या खेलो इंडिया क्रीडा महोत्सवाला दिनांक ९ जानेवारी रोजी प्रारंभ झाला होता. त्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक व अन्य पदाधिकारी मिळून १० हजार लोकांचा सहभाग होता. त्यात ३६ राज्यांतील सुमारे ६ हजार खेळाडू, १ हजार ८०० तांत्रिक अधिकारी, १ हजारहून अधिक संघटक आणि ७५०स्वयंसेवक सहभागी झाले होते.