आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंग संघाची अवस्था खूपच वाईट झालेली दिसत आहे. संघाने आतापर्यंत 8 सामन्यांमधील 6 सामन्यांमध्ये पराभव पत्करलेला आहे. चेन्नईने काल मुंबई इंडियन्सकडून 9 विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर पुढच्या हंगामाच्या तयारीबद्दल भाष्य केले आहे. त्यानंतर आता संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सुद्धा तेच वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले त्यांच्या संघाची अवस्था या हंगामात बरोबर नाही, पण येणाऱ्या पुढच्या हंगामात संघ चांगली तयारी करून सुद्धा स्पर्धेमध्ये उतरेल.
मुंबईकडून पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून 176 धावा बनवल्या होत्या. नंतर धावांचा पाठलाग करताना मुंबईसाठी रोहित शर्माने नाबाद 76 धावांची पारी खेळली, तसेच सूर्यकुमार यादव ने सुद्धा 68 धावा केल्या. या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे की आता त्यांनी हार मानली आहे.
स्टीफन फ्लेमिंग यांनी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले की, जेव्हा तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रदर्शनापेक्षा सुद्धा खालच्या पातळीवर जाऊन खेळता, तेव्हा स्पर्धेमध्ये टिकून राहणे खूप कठीण असते. पण आम्ही आमच्या अशा जिवंत ठेवल्या पाहिजेत. या स्पर्धेमुळे जास्त गोष्टी बिघडणार नाहीत. आम्ही त्या सामन्यांवर जास्त लक्ष केंद्रित करू, जे आमच्या हातातून निसटले. कारण त्या गोष्टीच आम्हाला पुढच्या हंगामात चुका न करण्यासाठी मदत करतील.
फ्लेमिंग पुढे बोलताना म्हणाले, आता आमचा संघ ज्या परिस्थितीत आहे ते वास्तव आहे. पण पुढच्या हंगामात खेळाडू शोधण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. या हंगामात इथून पुढे आम्ही आमच्याकडून चांगलेच खेळण्याचा प्रयत्न करू, जरी आम्ही प्लेऑफमध्ये नाही पोहोचू शकलो तरी सुद्धा पुढच्या हंगामासाठी आम्ही चांगलाच संघ म्हणून मैदानावर उतरू.





