कोरोना महामारीमुळे पुढे ढकलला गेलेल्या इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाच्या अनुषंगाने एफसी गोवाने सराव सुरु केला आहे. एफसी गोवा संघ आयएसएलसोबतच एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एफसी गोवाचे सहायक प्रशिक्षक क्लिफोर्ड मिरांडा यांच्या निगराणीखाली संघाने पूर्वहंगाम प्रशिक्षणाला गोव्यातील ईला ग्राउंड येथे सुरुवात केली आहे. आयएसएलचा सातवा हंगाम डिसेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.
एफसी गोवा व्यवस्थापनाने काढलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “संघाचे पूर्वहंगाम प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. सध्या शिबिरात फक्त भारतीय खेळाडू आहेत. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, ईशान पंडिता व लेन डोंगल हे कोविड-१९ मुळे विलगीकरण कक्षात आहेत. त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर ते संघासोबत जोडले जातील. बरेच दिवस मैदानापासून दूर असल्याने खेळाडू, अजूनही आपली तंदुरुस्ती व वेग मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच सर्व क्षमतेनिशी प्रशिक्षणास सुरुवात होईल.”
संघाचा प्रमुख भारतीय खेळाडू व मध्यरक्षक लेनी रॉड्रिगेज म्हणाला, “बर्याच दिवसांनी मैदानावर उतरल्यानंतर सर्व खेळाडू आनंदी आहेत. इतके दिवस मैदानापासून दूर राहणे अत्यंत दुःखदायक होते.”
शिबिराविषयी तो पुढे म्हणाला, “मिरांडा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हंगामापूर्वी अशी शिबिरे संघाला लाभदायक ठरतील. अजून वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी, आम्हाला अपेक्षा आहे की, एफसी गोवाचे सर्व सामने गोव्यातच होतील.”
जगभरात इतरत्र फुटबॉल लीग विनाप्रेक्षक सुरू झाल्यानंतर, भारतातही आयएसएल व आय-लीगचे पुढील हंगाम सुरू करण्याच्या दिशेने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने प्रयत्न चालवले आहेत.