आयपीएल २०२० चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. यातील केवळ क्वॉलिफायर २ आणि अंतिम असे केवळ २ सामने राहिले आहेत. या हंगामात अनेक स्वदेशी आणि परदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. परंतु काही खेळाडू असे होते, ज्यांना करोडो रुपये देऊन संघात सामील केले. परंतु त्यांना चमकदार कामगिरी करता आली नाही.
लिलावात ६२ खेळाडूंना संघात केले सामील
मागील वर्षी डिसेंबर २०१९ मध्ये आयपीएल २०२० साठीचा लिलाव पार पडला. या लिलावात तब्बल ६२ खेळाडूंना आयपीएलमधील ८ फ्रँचायझी संघांनी आपल्या ताफ्यात सामील केले. परंतु सर्वात महागडे ठरलेले गोलंदाज हे केवळ ५ आहेत. त्यांना भल्या मोठ्या रकमेत संघात घेतले, पण कामगिरीच्या बाबतीत ते सपशेल फ्लॉप ठरले.
ग्लेन मॅक्सवेलसाठी मोजले होते १०.७५ कोटी
आयपीएल इतिहासात एकदाही विजेतेपद न पटकावणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठ्या आशेने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १०.७५ कोटी रुपयांना संघात घेतले होते. परंतु त्याने आपल्या कामगिरीने संघाला निराश केले. त्याची मागील कामगिरी पाहून संघाने इतके सारे रुपये त्याच्यासाठी मोजले होते.
ठोकला नाही एकही षटकार
आपल्या मोठ- मोठ्या गगनचुंबी षटकारांसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलची बॅट यावर्षी गपगार होती. त्याला संपूर्ण हंगामात एकही षटकार ठोकता आला नाही.
केल्या फक्त १०८ धावा
मॅक्सवेलने या हंगामात १३ सामने खेळले. सुरुवातीपासूनच त्याला चांगली फटकेबाजी करता आली नाही. हे सामने खेळताना त्याने केवळ १५.४२ च्या सरासरीने आणि १०१.८८ च्या स्ट्राईक रेटने १०८ धावा केल्या. १० कोटी ७५ लाख रुपयांना लिलावत संघात घेतलेल्या या खेळाडूची एक धाव किंग्ज इलेव्हन पंजाबला तब्बल ९ लाख ९५ हजारांना पडली आहे.
१३ सामन्यात फक्त ३ विकेट्स
मॅक्सवेल आपल्या गोलंदाजीतही सपशेल फ्लॉप ठरला. त्याने १३ सामन्यात गोलंदाजी करताना तब्बल ५६.३३ च्या सरासरीने १६९ धावा देत केवळ ३ विकेट्स घेतल्या.
इतर महागडे गोलंदाज
पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स)
आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक महागडा ठरलेला परदेशी गोलंदाज म्हणजे पॅट कमिन्स. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १५.५० इतक्या मोठ्या रकमेत संघात सामील केले होते. यामध्ये त्याने इंग्लंडचा बेन स्टोक्सलाही मागे टाकले होते. स्टोक्सला २०१७ साली झालेल्या आयपीएल लिलावात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने तब्बल १४.५० कोटी रुपयांना ताफ्यात दाखल केले होते.
कमिन्सने या हंगामात फार चांगली कामगिरी केली नाही. त्याने १४ सामने खेळताना ३४.०८ च्या सरासरीने केवळ १२ विकेट्स घेतल्या. फलंदाजी करताना त्याने १४६ धावाही केल्या.
ख्रिस मॉरिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या १३ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने तब्बल १० कोटी रुपयांना संघात सामील केले. त्यानेही या हंगामात आपल्या कामगिरीने निराश केले. त्याने ९ सामने खेळताना २१० धावा देत ११ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त फलंदाजी करताना त्याने केवळ ३४ धावा केल्या.
शेल्डन कॉट्रेल (किंग्ज इलेव्हन पंजाब)
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मॅक्सवेलवर १०.७५ कोटी रुपये खर्च करूनही संघासाठी ८.५० कोटी रुपये खर्च करत आणखी एका गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील केले. तो खेळाडू म्हणजेच शेल्डन कॉट्रेल. कॉट्रेल आपल्या सेलिब्रेशन स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याची ही स्टाईल या हंगामातही आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु कॉट्रेलला ही स्टाईल केवळ ६ वेळाच दाखवता आली. त्याने ६ सामने खेळताना तब्बल १७६ धावा देत केवळ ६ विकेट्स घेतल्या.
नेथन कुल्टर नाईल (मुंबई इंडियन्स)
चार वेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सने या हंगामासाठी लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नेथन कुल्टर नाईलवर मोठी बोली लावली. त्यांनी कुल्टर नाईलला ८ कोटींमध्ये संघात सामील केले. परंतु त्याने खास काही कामगिरी केली नाही. त्याने ६ सामने खेळताना तब्बल १७७ धावा देत केवळ ३ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त फलंदाजी करताना केवळ २५ धावांची नोंद आपल्या नावावर केली.