आजकाल अनेकदा आपण ऐकतो की एखादा खेळाडू किंवा क्रीडा संस्था एखाद्या वस्तूचा विविध कारणांनी लिलाव करतात. अनेकदा कोणाच्यातरी मदतीसाठी हे पाऊल उचलले जाते. अशा लिलावांमधून मोठी रक्कमही त्या खेळाडूला किंवा त्या क्रीडा संस्थांना मिळते. बऱ्याचदा ही रक्कम एखाद्या गरजूला किंवा एखाद्या चॅरिटी ट्रस्टकडे सोपवली जाते. पण असाच काहीसा प्रकार ५७ वर्षांपूर्वी झाल्याचे दिसून येत आहे.
रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यातील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पत्रकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहिला, तर तो सामना १९६५ साली साताऱ्यात मुंबई विरुद्ध महाराष्ट्र संघातील असल्याचे लक्षात येते. या फोटोमध्ये त्या सामन्यात खेळलेल्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली दिसून येत आहे.
या फोटोमध्ये दिसते की हा तीन दिवसीय सामना होता. हा सामना १६, १७ आणि १८ जानेवारी १९६५ रोजी खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडू खेळले होते. तसेच या सामन्याचा भाग झालेल्या सर्व २२ खेळाडूंनी या पत्रकावर स्वाक्षरी केलेली दिसत आहे. या पत्रकावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्यांपुढे १ रुपया अशी किंमत लिहिलेली दिसत आहे.
या पत्रकाच्या खाली टीप लिहिली असून त्यात लिहिले आहे की ‘या विक्रीचे सर्व उत्पन्न सुप्रसिद्ध क्रिकेटप्रेमी श्री. बाबू टांगेवाले यांना दिले जाणार आहे.’ मात्र, हे उत्पन्न कोणत्या कारणांनी बाबू टांगेवाले यांना दिले जाणार होते, याबद्दल काहीही माहिती या पत्रकात दिलेली नाही.
या पत्रकात दिसते की मुंबईकडून खेळलेल्या बापू नाडकर्णी, शरद दिवाडकर, फारुख इंजिनियर, दिलीप सरदेसाई, मनोहर हर्डिकर, रमाकांत देसाई, अशोक मंकड, वासू परंजपे, अरुण बर्वे, उमेश कुलकर्णी, एसव्ही मोरे, बाळू गुप्ते, अजीत वाडेकर आणि सुधीर नाईक या क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच बापू नाडकर्णी या सामन्यासाठी कर्णधार आणि दिवाडकर उपकर्णधार असल्याचेही समजते.
याशिवाय महाराष्ट्राकडून खेळलेल्या कर्णधार चंदू बोर्डे, नाना जोशी, विजय भोसले, शेख मोहम्मद, अविनाश जोशी, बाबा सिंधये, सदानंद मोहोळ, हेमंत कानेटकर, मधू गुप्ते, ज्ञानेश्वर आगाशे, दत्ता खेर, हेमंत गोरे, तोडलबाजी गौरप्पा आणि पांडव या क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या पत्रकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असला, तरी याबद्दल आणखी काही माहिती सध्या उपलब्ध नाही.
तसेच हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ३०९ धावा केल्या होत्या, तर मुंबईने पहिल्या डावात २९५ धावा केल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राकडे १४ धावांची आघाडी होती. महाराष्ट्राने अखेरच्या दिवसापर्यंत दुसऱ्या डावात ५ बाद १५७ धावा केल्या होत्या.
कोण आहे बाबू टांगेवाले?
साधारण ४० च्या दशकानंतर हे नाव मराठी क्रिकेटविश्वात गाजले होते. सह्याद्री या नियतकालिकेत १९४६ मध्ये छापलेल्या एका लेखानुसार पुण्याचा रहिवासी असलेला बाबू टांगेवाला पुण्यात होणारे सामने पाहायला जायचा. त्यावेळी तो एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केल्यास सरळ जाऊन त्याच्या गळ्यात हार घालत असे. त्याची ख्याती चांगलीच पसरु लागल्यावर त्याला हक्काने तिकिटंही दिली जाऊ लागली. तो त्यावेळी टांगा चालवण्याचा व्यवसाय करायचा. सातत्याने क्रिकेट सामने पाहिल्याने त्याच्याकडे क्रिकेटने ज्ञानही भरपूर होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“अन् ‘त्या’ सल्ल्यामुळे धोनीला दिले कर्णधारपद”, शरद पवारांचा जुन्या आठवणींना उजाळा
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताच्या ताफ्यात ‘या’ धाकड खेळाडूची एंट्री! ऑस्ट्रेलियाची आता काही खैर नाही
आता मेंटर बनणार युवी? प्रतिष्ठित लीगमध्ये ‘या’ संघाने दिली ऑफर