-प्रणाली कोद्रे
गेल्या २ दशतकातील क्रिकेट पाहिले तर करोडोंमध्ये प्रसारण हक्क विकेले गेल्याचे ऐकले असेल. अनेक प्रायोजकांनी कोटींची करार क्रिकेट बोर्डांबरोबर तसेच खेळाडूंबरोबर केले. आयपीएलने तर या सगळ्याचे शिखर गाठले. गेल्या २ दशकात मोठा पैसा क्रिकेटमधून भारतात आला. त्याचाच परिणाम म्हणून बीसीसीआय आज सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. पण भारतीय क्रिकेटमध्ये इतका पैसा येण्यात एका व्यक्तीचे सर्वात मोठे योगदान होते. त्याने त्याच्या अमेरिकन स्टाईल मार्केटिंगने भारतीय क्रिकेटला उज्जल भविष्याचा मार्ग दाखवला. मात्र नशीबाचा खेळ असा की त्याला भारतीय क्रिकेटमध्ये झालेली प्रगती स्वत: पहाता आली नाही. त्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला. तो व्यक्ती म्हणजे मार्क मस्करेन्हास.
हो, तोच मार्क मस्करेन्हास ज्याचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने त्याच्या निवृत्तीच्या भाषणात घेतले होते. तोच मार्क मस्करेन्हास ज्यानी युवा सचिनला एका रात्रीत करोडपती बनवले होते. मार्क एक मोठा माणूस, कर्मानेही आणि शरिरयष्टीनेही. ६ फूट २ इंच उंची असलेला, चांगली तब्येत असलेल्या मार्कचे व्यक्तीमत्त्व एका बिझनेमनला शोभावे असेच होते.
ती वेळ होती जेव्हा भारताने १९८३ विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटमध्ये प्रगतीला नवी सुरुवात केली होती. पण तरीही पैसा काही भारतीय क्रिकेटमध्ये म्हणावा तसा खेळत नव्हता. त्यावेळी भारतीय क्रिकेट हाती आले ते आयएस बिंद्रा आणि जगमोहन दालमिया यांच्या. त्यांचाही भारतीय क्रिकेटला मोठे बनवण्यात मोठा हात आहे. त्यावेळी पहिले तीनही विश्वचषक इंग्लंडमध्ये झाले होते. पण त्यानंतर इंग्लंडकडून दालमियांच्या मदतीने भारताने १९८७ आणि १९९६ चा विश्वचषक आयोजित करण्याचा हक्क मिळवला. यावेळी त्यांनी पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश क्रिकेट बोर्डांनाही बरोबरीत घेतले, जेणेकरुन त्यांची मदत मिळेल.
१९८७ चा विश्वचषक भारत आणि पाकिस्तानने मिळून आयोजित केला होता. त्यावेळी अंतिम सामना कोलकाताला झाला होता. आता वेळ होती ती १९९६ च्या विश्वचषकाची. एक विश्वचषक आयोजित करायचा म्हणजे त्याची मोठी तयारी करावी लागते. प्रायोजकांपासून प्रसारण हक्कांपर्यंत सर्व आयोजित करावे लागते. त्यासाठी किमान ५ वर्षांपासून एखादे क्रिकेटबोर्ड तयारी करत असतात. त्यानुसार १९९६ च्या विश्वचषकाची तयारीही १९९० च्या आसपास भारताने सुरु केली होती.
त्यावेळी पाकिस्तानची इच्छा होती की यावेळीचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये व्हायला हवा. तो विश्वचषक श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत मिळून आयोजित करत होते. तेव्हा दालमिया पाकिस्तानमध्ये अंतिम सामना आयोजित करण्यात तयार झाले कारण कदाचित त्यांना एक गोष्ट लक्षात आली होती की मैदानातील प्रेक्षकांबरोबरच हा सामना घराघरात पोहचवण्यात मोठा फायदा आहे. पण त्यासाठी खाजगी चॅनल्सला प्रसारण हक्क मिळायला हवेत. इथेच गुढी रोवली गेली ती खाजगी चॅनल्सवर आज आपण क्रिकेट सामने पाहायला मिळतात त्याची.
तेव्हा भारताचे क्रिकेट सामने प्रसारित करण्याचे सर्व हक्क दूरदर्शनकडे होते. त्यामुळे दालमियांनी न्यायालयाची मदत घेतली त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे क्रिकेट सामन्यांचे प्रसारण करण्याचे हक्क खाजगी चॅनललाही मिळायला हवेत असा युक्तीवाद केला. ज्यामुळे हे चॅनेल बीसीसीआयला सामना प्रसारित करण्यासाठी पैसा देतील. त्यानुसार दालमिया खाजगी चॅनेललाही प्रसारण हक्क मिळतील असा निर्णय घेऊन आले. त्यानंतर पहिल्यांदा १९९३ ला भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेच्या प्रसारणाचे हक्क विकले गेले. ट्रांस वर्ल्ड इंटरनेशनल (TWI) नावाच्या कंपनीने हे हक्क विकत घेतले. तेव्हा क्रिकेट हा खेळ अर्थिकदृष्टीनेही मोठा होण्यास सुरुवात झाली. यानंतर वेळ होती ती १९९६ च्या विश्वचषकाच्या प्रसारण हक्काची.
त्यावेळी ट्रांस वर्ल्ड इंटरनेशनल (TWI) ने यासाठी ८५ लाख डॉलरची बोली लावली. पण ते ऍडवान्स द्यायला तयार नव्हते आणि बीसीसीआयला ऍडवान्सची मोठी गरज होती. विश्वचषक आयोजनासाठी क्रिकेट सुविधांमध्ये बदल करायचे होते. भविष्यासाठीही हे महत्त्वाचे होते. आशियाई देश भव्य आयोजन करु शकतात हे जागतिक क्रिकेटला दाखवून द्यायचे होते. त्याचवेळी मदतीला आला बंगळुरुमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेला मार्क.
त्यावेळी हजार-लाख अशा बोली करण्याचा काळात मार्कने थेट अमेरिकन डॉलर्सची बोलणी करण्यास सुरुवात केली. त्याची लंडनमध्ये एका फ्लॅटमध्ये दालमिया आणि बिंद्रा यांच्याबरोबर बोलणी झाली. त्यावेळी मार्कची कंपनी वर्ल्डटेलने १ कोटी डॉलरची बोली लावण्याची तयारी दाखवली. त्याने २५ लाख डॉलर लगेचच देण्याचेही मान्य केले. मार्कच्या मते हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा जुगार होता. त्या विश्वचषकातून मार्कने २ कोटी डॉलर कमावले.
त्यावेळी वर्ल्डटेल कंपनीने केबल्स, सॅटेलाईट डिशेस, परदेशातून गुणवत्ता असणारे तज्ञव्यक्ती , कॅमेरा अशी सगळी व्यवस्था केली. एवढेच नाही तर टोनी ग्रेग, इयान चॅपेल, मायकल होल्डींग अशा समालोचकांची टिमही त्यांनी भारतात आणली. त्यासाठी मार्क यांनी ऑस्ट्रेलियातील चॅनेल ९ चे सर्वेसर्वा महान कॅॅरी पॅकर यांची भेट घेतली. त्यांच्याकडून त्यांच्या समालोचकांची मागणी केली. परंतू पॅकर हे देखील हुशार होते. त्यांनी समालोचकांना देण्याची तयारी दाखवली पण त्यासाठी त्यांनी अट घातली की सर्व समालोचक चांगल्या हॉटेलमध्ये राहतील एवढेच नाही तर त्यांच्यासाठी खाजगी जेटही हवी. ही अट मार्क यांनी मान्य केली. मार्कने विजय मल्याशी संपर्क साधत किंगफीशर जेटची व्यवस्था देखील केली.
पण एवढे सगळे करणारा हा मार्क आला कुठून होता? तो होता बंगळुरुचा मुलगा. १९७६ ला कम्यूनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता. त्याने तिथे त्याच्या मेहनतीने टिव्ही प्रोडक्शनमध्ये हात बसवला होता. शिक्षणानंतर सीबीएस या टेलिव्हिजन ग्रुपच्या कंपनीमध्ये रेडिओ विभागातून त्याने एक सेल्समन म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. आऊटलूक मासिकेतील एका रिपोर्टनुसार मार्कला त्यांचा पहिला बॉस रॉन गिल्बर्टने नोकरीला ठेवले होते.
त्यावेळी सीबीएस कंपनीची एक पॉलिसी होती की नोकरी शोधत असणाऱ्या लोकांना ते मुलाखतीची संधी द्यायचे. त्यानुसार मार्क त्यांच्याकडे मुलाखतीसाठी आला होता. मुलाखतीनंतर त्याने जाताना विचारले होते की गिल्बर्ट तूम्ही त्या लोकांपैकी आहात का ज्यांची कमाई हाताखाली काम करणाऱ्या सेल्समनच्या कामामुळे कमी-जास्त होत असते. त्यावर गिल्बर्ट यांनी हो म्हटल्यानंतर मार्कने उत्तर दिले होते की मला फॉक्सवॅगन विकून बीएमडब्ल्यू घ्यायची आहे. भारतातून कुंटुंबाला घेऊन यायचे आहे. अशा माझ्या अनेक इच्छा आहेत आणि मला त्या पूर्ण करण्यासाठी चांगले काम करावेच लागेल. मार्कचे हे उत्तर ऐकून गिल्बर्ट यांनी त्याला सेल्समन म्हणून नोकरीवर ठेवून घेतले.
गिल्बर्ट यांचा विश्वास मार्कने योग्य ठरवला. तो कंपनीचा बेस्ट सेल्समन बनला होता. त्याचे वेतनही ३ पटीने वाढले. काही वर्षातच त्याने रेडिओमधून टीव्ही विभागात आपला मोर्चा वळवला. त्याने कंपनीला मोठमोठे करार करुन दिले. काही वर्षांतच त्यांचे वेतन कोटी डॉलरमध्ये पोहचले. ती वेळ होती ८० च्या दशकातील. त्यांना भारतीय टीव्ही मार्केटमध्येही यायचे होते. त्याने दूरदर्शनला स्पोर्ट्ससेटअप बनवण्यासाठी त्यांचे सॉफ्टवेअर आणि कमाईतील ३० टक्के देण्याची ऑफर दिली होती. परंतू त्यावेळी इंदिरा गांधींच्या सरकारने अमेरिकन कंपनीबरोबर करार करण्यास नकार दिला.
यानंतर १९८९ मध्ये मार्कने स्वत:च्या मालकीची कंपनी सुरु केली. तोपर्यंत त्याला खेळांच्या प्रसारणाचे गणित लक्षात आले होते. त्याने फुटबॉल, स्कीइंग अशा खेळांचे प्रसारणाचे हक्क घेतले होते. नंतर आला तो १९९६ चा विश्वचषक.
मार्कला त्याच्या कंपनीचे नाव मोठे करायचे होते. त्याने सुरुवातीला भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्याबरोबर करार केला. त्यानंतर त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे युवा सचिन तेंडुलकरबरोबर करार करण्याचा जेमतेम २२-२३ वर्षांचा असणाऱ्या सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन ६ वर्षेच झाली होती. पण मार्कने त्याची प्रतिभा जाणली होती. १९९६ चा विश्वचषक सुरु होण्याआधी सचिनबरोबर एक करार केला. त्यावेळी सचिन ५-६ जाहिरातीतून १५-१६ लाख रुपये कमावत होता. पण मार्कने त्याच्याबरोबर ऑक्टोबर १९९५ ला ५ वर्षांसाठी करार केला. तो करार होता तब्बल ७५ लाख डॉलरचा. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये साधारण २६-२७ कोटींचा. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती. याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण यावर शास्त्रींनी उत्तर दिले होते की सचिन यासाठी डिझर्विंग होता.
याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की यातून मार्क यांना किती फायदा होणार. खरच यातून काही फायदा होणार का? पण त्याचवेळी सचिनची कामगिरी अफलातून व्हायला सुरुवात झाली होती. तीन वर्षांच्या आत सचिनने अशा करारांवर स्वाक्षरी केली की त्यातून त्याला १ कोटी डॉलरची कमाई झाली. म्हणजेच गुंतवणूकीपेक्षा २५ लाख डॉलर अधिक कमाई झाली होती आणि आणखी २ वर्षे बाकी होती. त्यावेळी एमआरएफ, आदिदास, फिलिप्स, पेप्सी, बूस्ट अशा कंपनीने वर्ल्डटेलबरोबर करार केले होते. सचिन पाठोपाठ सौरव गांगुली, रॉबिन सिंग, अजित आगरकर अशा भारतीयांनीही तर शेन वॉर्न, शोएब अख्तर अशा परदेशी खेळाडूंनीही मार्कबरोबर करार केले होते.
पण सचिन व्यतिरिक्त त्यांना इतर क्रिकेटपटूंना अधिक काळ मॅनेज करता आले नाही. ४ वर्षे गांगुलीला मॅनेज केल्यानंतरही त्याच्याबरोबर मार्कचे वाद झाले. मात्र सचिनबरोबर मार्क कायम राहिले. अगदी १९९९ च्या विश्वचषकावेळी जेव्हा सचिनच्या वडिलांचे निधन झाले होते तेव्हा स्पर्धेच्या अर्ध्यातून भारतात परतण्याची सगळी सोय मार्कने केली होती. तो त्याच्या पाठीशी स्वत:चा मुलगा असल्याप्रमाणे उभा राहिला. तो नेहमी सचिनला माझा मुलगा म्हणायचा.
इएसपीएनने दिलेल्या रिपोर्टनुसार इयान चॅपेल यांनी १९९८ ला शारजामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील मार्कबद्दलची एक आठवण सांगितली. त्यावेळी टीव्ही प्रसारणाचे हक्क मार्कने मिळवले होते. त्या मालिकेतील भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान ग्रेग आणि इयान चॅपेल समालोचन करत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला २८४ धावांचे कठिण आव्हान दिले होते. भारताला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी विजय आवश्यक होता किंवा कमी फरकाने पराभव स्विकारावा लागणार होता. नाहीतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना होणार होता. ऑस्ट्रेलियाने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यावेळी सामनादरम्यान मार्क यांनी इयान आणि ग्रेग या चॅपेल बंधूंना विचारले की सामन्याबद्दल काय वाटते त्यावेळी इयान आणि ग्रेग या दोघांनीही मार्कला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना होई शकतो असा अंदाज वर्तवला.
पण त्याचवेळी सचिनने एक उत्तम शतक केले आणि पराभवानंतरही भारताला अंतिम सामन्यात प्रवेश मिळून दिला. त्यावेळी इयान मार्कला म्हणाले होते सचिन फक्त आव्हानाचा पाठलाग करत नाही तर त्याला हा सामना जिंकूनच द्यायचा आहे. सामना संपल्यानंतर मार्कने चॅपेल बंधूना त्यांचा अंदाज चूकल्याची जाणीवही करुन दिली होती आणि लगेचच जाऊन सचिनचे कौतुक केले होते. इतकेच नाही तर सचिनचा मॅनेजर म्हणून त्याने प्रायोजकांबरोबर बोलून जर सचिनने अंतिम सामन्यात शतक केले आणि भारताला सामना जिंकून दिला तर त्याला कार मिळेल याची तयारी केली. सचिननेही हा विश्वास सार्थ ठरवला. सचिनने अंतिम सामन्यात शतक तर ठोकलेच पण भारताला विजेतेपदही मिळवून दिले. त्यावेळी सचिनला कार तर मिळालीच. पण त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
23. In 1995, WorldTel signed a multi-million dollar deal with Sachin Tendulkar. Sachin—the brand became quite popular. Mark Mascarenhas changed the life of the Little Master. In 2001, Sachin struck a 100-cr deal with WorldTel#HappyBirthdaySachin
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) April 24, 2020
अनेकांना असे वाटले की मार्क यांना परिस स्पर्श होता. पण असे नव्हते की मार्क यांचे सगळेच करार यशस्वी झाले. त्यांचे दालमियांबरोबरील संबंधही फारसे बरे नव्हते. एवढेच नाही तर मार्कला श्रीलंका क्रिकेट बोर्डाबरोबर वाद घालावे लागले. गांगुलीबरोबर वाद झाले. तो कोठून आला वैगरे प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे सीबीआय चौकशी झाली. इनकम टॅक्सची रेड पडली. पण प्रत्येकवेळी मार्कने हेच सांगितले की मी चूकीचा नाही.
मार्कने त्याची एक क्रिकेट वेबसाईट आणि मासिकेचेही अनावरण केले होते परंतू त्यावेळी भारतात इंटरनेट ही गोष्ट फार नवीन होती. त्यामुळे मार्कला यात अपयश आले. त्यावेळी मार्क म्हणाला होता जेव्हा मार्केटमध्ये बैलगाडी हवी होती तेव्हा मी रॉल्स रॉयल उतरवली होती.
२००१ ला मार्कच्या वर्ल्डटेल कंपनीने सचिनबरोबर पुन्हा १०० कोटींचा करार केला. मात्र यानंतर २७ जानेवारी २००२ ला मार्कचा कार अपघात झाला. नागपूरपासून ८० किलोमीटर दूर त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि गाडी उलटी झाली. मार्कने त्यावेळी जागीच शेवटचा श्वास घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा इंग्लंडबरोबर सामना होता. त्यावेळी सर्व भारतीय खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. सचिनसाठी हा मोठा धक्का होता. पण त्याने धैर्य दाखवत इंग्लंडने दिलेल्या २१८ धावांचा पाठलाग करताना ६७ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. सचिनने मार्कच्या जाण्यानंतरही २००६ पर्यंत वर्ल्डटेलबरोबरचा करार कायम ठेवला होता. सचिनसाठी मार्कचे स्थान फार महत्त्वाचे होते. त्याचमुळे सचिनने जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा त्याने भाषणात उल्लेख केलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये मार्कचाही समावेश होता.
My dear friend, late Mark Mascarenhas, my first manager. We unfortunately lost him in a car accident in 2001, but he was such a well-wisher of cricket, my cricket, and especially Indian cricket. He was so passionate. pic.twitter.com/gaXVgWwWzI
— Sachin Tendulkar Trends (@TrendsSachin) November 16, 2018
मार्कबद्दल इयान चॅपेल यांनी लिहिले होते की मार्कला नेहमी प्रसारणासाठी उच्च स्तराचे सर्वकाही पाहिजे होते. एकदम कॅरी पॅकर सारखे. त्याने भारतीय टेलिव्हिजनला कायमचे बदलून टाकले होते. पॅॅकर ज्यांनी क्रिकेटला रंगीत बनवण्यात, अनेक कॅमेरांसह सामने लाईव्ह करण्यात, सामना दिवस-रात्र करण्यात आणि लाल-पांढरा चेंडू आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता, त्यांच्याशी इयान यांनी मार्कची तुलना केली होती. यावरुनच मार्क यांचे भारतीय क्रिकेटमध्ये आणि टेलिव्हिजन क्षेत्रात किती मोठे योगदान होते हे लक्षात येईल.