टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) चा पहिला दिवस रोमांचक ठरल्यानंतर, दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि नेपाळ (England vs Nepal) यांच्यातील सामनाही तितकाच अटीतटीचा झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 184 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा स्टार खेळाडू दीपेंद्र सिंग ऐरीने (Dependra Singh Erry) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जोपर्यंत दीपेंद्र मैदानात होता, तोपर्यंत नेपाळचे चाहते जल्लोष करत होते, तर दुसरीकडे इंग्लंडच्या गोटात चांगलीच घबराट पसरली होती.
दीपेंद्र सिंग ऐरीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत 29 चेंडूंत 44 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. जरी तो अर्धशतकापासून मुकला असला, तरी त्याच्या फटकेबाजीने सामन्यात रंगत आणली.
दीपेंद्र सिंग ऐरी हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि युवराज सिंगचा (Yuvraj Singh) विक्रम मोडण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक (Fastest Fifty) करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे, युवराज सिंगप्रमाणेच त्यानेही एका षटकात 6 चेंडूंत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
दीपेंद्र सिंग ऐरीचा जन्म 24 जानेवारी 2000 मध्ये झाला आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीमध्येही तरबेज आहे. 2023 मध्ये मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 9 चेंडूंत अर्धशतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.






