भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी ६ दिग्गजांचे अर्ज आले असून त्यातून एकाची निवड येत्या १० जुलै रोजी क्रिकेट सल्लागार समिती अर्थात व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली करणार आहेत.
क्रिकेट जगतातील अनेक अनुभवी माजी खेळाडूंचे अर्ज यासाठी आले आहेत. त्यातील मुख्य ६ जणांची ही ओळख
रवी शास्त्री
जगातील असंख्य क्रिकेटप्रेमींचा हा चेहरा ओळखीचा. भारताकडून ८० कसोटी सामने आणि १५० एकदिवसीय सामने खेळलेल्या शास्त्री यांचं पारडं भारतीय प्रशिक्षक पदासाठी सर्वात जड मानलं जात आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय संघाचे सचिव म्हणून २००४ आणि २०१६ साली काम पहिले आहे. जमेच्या बाजू म्हणजे विराट कोहलीशी असलेले चांगले संबंध, स्वतः सचिन तेंडुलकरने अर्ज भरण्यासाठी केलेली विनंती, २०१५-२०१६ मध्ये टीम मॅनेजर म्हणून केलेली उत्तम कामगिरी.
सध्या तरी रवी शास्त्री हेच या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
वीरेंद्र सेहवाग
भारताचा हा माजी स्फोटक फलंदाज भारताकडून १०४ कसोटी सामने, २५१ एकदिवसीय सामने आणि १९ टी२० सामने खेळला आहे. अर्ज केलेल्या सर्व माजी खेळाडूंमध्ये सेहवागचा अनुभव खेळाडू म्हणून सर्वात जास्त आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा मेंटॉर म्हणून काम पहिले आहे. सुरवातीच्या काळात मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सेहवागचे नाव सर्वात पुढे होते. परंतु अनिल कुंबळेने विंडीज दौऱ्यापूर्वी राजीनामा दिल्यांनतर सेहवागच नाव हळू हळू मागे पडत गेलं. प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून सेहवागकडे पहिले जात आहे.
टॉम मूडी
जर एक उत्तम प्रशिक्षक आणि त्याला असणारा अनुभव या बळावर जर कुणाला प्रशिक्षक म्हणून निवडले गेले तर त्यात सर्वात आघाडीवर टॉम मुडीच नाव असेल. ५१ वर्षीय मुडी ऑस्ट्रेलियाकडून ८ कसोटी आणि ७६ एकदिवसीय सामने खेळला आहे. श्रीलंका टीमचा मुख्य प्रशिक्षक तसेच वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, सनरायसर्स हैद्राबाद संघाचा प्रशिक्षक म्हणूनही टॉम मुडीने काम पहिले आहे.
मुडी यांनी तिसऱ्यांदा या पदासाठी अर्ज केला असून यापूर्वी त्यांनी ग्रेग चॅप्पेल आणि अनिल कुंबळे प्रशिक्षक झाले तेव्हा अर्ज केला होता.
लालचंद राजपूत
५५ वर्षीय मुंबईकर लालचंद राजपूत हेही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. भारताकडून २ कसोटी सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळलेले राजपूत देशांतर्गत क्रिकेटमध्ये १००हुन अधिक अ श्रेणीचे सामने खेळले आहेत. भारतीय अंडर १९, इंडिया अ, मुंबई इंडियन्स, अफगाणिस्तानचा राष्ट्रीय संघ यांचे ते प्रशिक्षक राहिले आहेत. तसेच त्यांनी भारतीय संघाचे टीम मॅनेजर म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे . ते टीम मॅनेजर असतानाच भारतीय संघाने आफ्रिकेत झालेला टी२० विश्वचषक जिंकला होता. प्रशिक्षक म्हणून अनुभव हा मुद्दा विचारात घेतला तर टॉम मूडी यांच्याप्रमाणे लालचंद राजपूत यांचं पारडं जड मानलं जाईल. गेल्यावर्षीही त्यांनी या पदासाठी अर्ज केला होता.
रिचर्ड पायबस
एक प्रथम श्रेणी सामना खेळलेल्या इंग्लंडच्या रिचर्ड पायबस यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. पाकिस्तान तसेच बांग्लादेश संघांचे राष्ट्रीय प्रशिक्षक राहिलेल्या रिचर्ड पायबस यांनी सततच्या दुखापतीमुळे क्रिकेट खेळण्यापेक्षा प्रशिक्षण देण्याला प्राधान्य दिले. ते मिडलसेक्स तसेच आफ्रिकेतील टायटन्स केप कोब्राज संघाचेही प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी वेस्ट इंडिज संघाचा डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.
डोडा गणेश
गोवा रणजी संघाचं प्रशिक्षक पद डोडा गणेश यांनी ४वर्ष सांभाळलं असून भारतीय संघाकडून त्यांनी ४ कसोटी सामने आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटचा मोठा अनुभव असलेल्या डोडा गणेश राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बेंगलुरु येथे अंडर-१६ आणि अंडर-१९ वयोगटातील खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. कर्नाटक संघाचे निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी योग्य कामगिरी केली आहे. सध्या ते भारतीय अंडर- १६ संघासोबत नागालँड येथे कॅम्पसाठी गेले आहेत.