दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून चेंडू छेडछाडीचे धक्कादायक प्रकरण घडले. या घटनेचे पडसाद संपूर्ण क्रिकेट जगतावर उमटले. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या घटनेनंतर त्यांच्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली.
कालच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्यावर पुढील सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली. तसेच चेंडू छेडछाड प्रकरणानंतर लगेचच स्मिथ कर्णधार पदावरून तर वॉर्नर उपकर्णधारपदावरून पायउतार झाले होते.
त्यामुळे काल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम पेन या नवीन कर्णधाराचे नाव घोषित केले होते. यष्टीरक्षक फलंदाज पेन ऑस्ट्रेलियाचा ४६ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. तसेच तो ऍडम गिलख्रिस्ट नंतरचा पहिलाच यष्टीरक्षक असेल जो ऑस्ट्रेलियाच्या संघाने नेतृत्व करणार आहे आणि टास्मानिया संघाकडून खेळलेला रिकी पॉन्टिंग नंतरचा तो ऑस्ट्रेलियाचा दुसराच कर्णधार ठरला आहे.
पेनचा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास बराचसा संघर्षपूर्ण राहिला आहे. हॉबर्ट येथे जन्मलेल्या या खेळाडूने २८ ऑगस्ट २००९ मध्ये स्कॉटलँड विरुद्ध वनडे सामन्यातून आंतराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याला लगेचच टी २० संघातही स्थान मिळाले. त्यानंतर जवळ जवळ ९-१० महिन्यांनी त्याला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळाले.
त्याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानात १३ जुलै २०१० ला कसोटी पदार्पण केले. या सामन्यात त्याने ५ झेल तर १ यष्टिचित केला होता. तसेच पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ४७ धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे याच सामन्यातून स्टीव्ह स्मिथनेही कसोटी पदार्पण केले होते. पण स्मिथची प्रगती होत असतानाच पेनला मात्र संघर्ष करावा लागला. चार सामने खेळल्यानंतर बोटाच्या दुखापतीमुळे पेनला संघाबाहेर जावे लागले. यानंतर ऑस्ट्रेलियायच्या कसोटी संघात येण्यासाठी ७ वर्षे त्याला त्याच्या पुनरागमनाची वाट पाहावी लागली.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याची ऍशेस मालिकेसाठी संघात निवड झाली. या मालिकेत त्यानेही यष्टिरक्षणात उत्तम कामगिरी करून आपले स्थान पक्के केले. त्याने ऍशेस मालिकेत २५ झेल आणि १ यष्टिचित अशा एकूण २६ विकेट्स घेतल्या.
या मालिकेनंतर त्याची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठीही निवड झाली. पण या दौरा वादामुळेच जास्त गाजला. अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरण बाहेर आल्याने स्मिथवर कर्णधारपद सोडण्याची वेळ आली. त्यामुळे अनपेक्षितपणे पेनकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली.
पेनने ऑस्ट्रेलियाकडून १२ कसोटी सामन्यात खेळताना ४१.६६ च्या सरासरीने ६२५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. तसेच त्याने ३० वनडे सामन्यात ३१.६२ च्या सरासरीने १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ८५४ धावा केल्या आहेत. तो १२ टी सामान खेळाला असून यात त्याला जास्त चमक दाखवता आलेली नाही. त्याने यात फक्त ८२ च धावा केल्या आहेत.
तसेच पेनने या काळात टास्मानियाच्या संघातही स्थान मिळवताना संघर्ष केला होता. कारण त्या संघात मॅथ्यू वेड हा यष्टीरक्षक फलंदाज होता. त्यामुळे पेनला संघात जागा मिळवणे अवघड जात होते.
पण आता पेनकडे ऑस्ट्रेलिया संघाचेच कर्णधारपद आल्याने त्याला संघाला संकटातून बाहेर काढून आणि संघाच्या मनस्थितीची विचार करून नेतृत्व करावे लागणार आहे. त्याचमुळे आता त्याच्या नेतृत्वगुणाचाही कस लागेल.