इंग्लंडचा भारत दौरा चालू असून कसोटी मालिकेचा टप्पा पार केल्यानंतर दोन्ही संघात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी १५ दिवस आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी२० संघाची घोषणा केली आहे. भारताच्या या १९ सदस्यीय टी२० संघात नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे; तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.
अशात या प्रतिभाशाली गोलंदाजाना नक्की का बाहेर ठेवण्यात आले असावे?, या प्रश्नाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, २७ वर्षीय बुमराह मागील काही काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. अशात त्याला शारिरीक आणि मानसिकरित्या आराम मिळण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे संंघ व्यवस्थापकांनी त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बुमराह इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो भारतीय संघाचा सदस्य होता. जवळपास अडीच महिने चाललेल्या या दौऱ्यात त्याने वनडे आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी एकूण ६ सामने खेळताना त्याने १५ विकेट्स घेतल्या होत्या. तत्पुर्वी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्येही तो मुंबई इंडियन्सचा नियमित सदस्य होता.
दुसरीकडे वेगवान गोलंदाज शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला कसोटी मालिकेतून माघार घेत भारतात परतावे लागले होते. काही महिन्यांची विश्रांती आणि उपचारानंतर शमीची दुखापत बरी झाली आहे. त्याने काही दिवसांपुर्वी गोलंदाजीचा सरावदेखील सुरु केला आहे. तरीही त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. याच कारणामुळे त्याला टी२० संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
रॉबिन उथप्पाची बॅट तळपली; आयपीएल २०२१ मध्ये धोनीच्या सीएसकेला जिंकून देणार चौथे जेतेपद?