क्रिकेटमध्ये कधी कोणाचे नशीब चमकेल हे सांगता येत नाही. असेच ३० एप्रिल रोजी, इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील पंजाब किंग्जच्या अष्टपैलू क्रिकेटपटूचे नशीब उजळले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज सामना होण्यापुर्वी या शिलेदाराचे नाव क्वचितच कोणाला परिचित असावे. परंतु या चुरशीच्या सामन्यात त्या शिलेदाराने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३ दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आणि एका रात्रीत हा शिलेदार प्रकाशझोतात आला. पंजाब किंग्जच्या या शिलेदाराचे नाव आहे, हरप्रीत ब्रार.
पंजाब किंग्जच्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला संथ सुरुवात मिळाली होती. तरीही सलीमीवीर देवदत्त पडीक्कल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटीदार मैदानावर तळ ठोकून होते. अशात पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने धाडसी निर्णय घेत २५ वर्षीय हरप्रीतच्या हाती डावातील अकरावे षटक सोपवले. त्यानंतर पुढील ७ चेंडूत असे काही घडले, ज्याची तुम्ही आम्ही कोणीही कल्पना केली नसावी.
अवघ्या ७ चेंडूत पालटला सामना
हरप्रीतने अकराव्या षटकातील पहिला चेंडू टाकला. यावेळी आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा कुटणारा विराट स्ट्राईकवर होता. त्याचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने गेला. यावर विराटने क्रिजवरील सीमारेषेच्या पुढे येत शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटला न लागता थेट यष्टीला जाऊन लागला.
पुढे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फॉर्मात असलेला धुरंधर ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि हरप्रीतने ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकत त्याची दांडी उडवली. त्याच्या गोलंदाजीचा करिश्मा एवढ्यावरच थांबला नाही. पुढील षटक पंजाब किंग्जचा युवा गलंदाज रवी बिश्नोईने टाकले. त्यानंतर पुन्हा डावातील हरप्रीत डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी आला आणि या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिस्टर ३६० एबी डिविलियर्सला केएल राहुलच्या हातून त्याने झेलबाद केले.
अशाप्रकारे अवघ्या ७ चेंडूत हरप्रीतने सामन्याचा कायापालट केला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची तिकडी बाद झाल्याने त्यांची फलंदाजी फळी कोलमडली आणि सामना पंजाब किंग्जच्या हातात आला. या सामन्यात हरप्रीतने ४ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/VishalKeche/status/1388214022877548544?s=20
दोन वर्षांपुर्वीच केले होते आयपीएल पदार्पण
हरप्रीतने आयपीएल २०१९ मध्येच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु पंजाब किंग्जने २० लाखांच्या मुळ किंमतीला विकत घेतलेला हा अष्टपैलू या हंगामात अधिक लक्षवेधी कामगिरी करु शकला नव्हता.
सात वर्षे दिली होती ट्रायल
विशेष म्हणजे, १८-१९ वर्षांचा असल्यापासूनच त्याचे पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्त्व करण्याचे स्वप्न होते. एका मुलाखतीत बोलताना हरप्रीतने यासंबंधी सांगितले की, मला आयपीएलमध्ये फक्त पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करायचे होते. त्यामुळे मी बऱ्याच वर्षांपासून या संघासाठी ट्रायल देत होतो. दरवर्षी जेव्हाही आयपीएलच्या हंगामाची तयारी सुरू व्हायची तेव्हा पंजाब किंग्जच्या सराव शिबीराच्या ठिकाणी पोहोचायचो. अखेर माझी ७ वर्षांची मेहनत फळाला आली आणि मला पंजाब किंग्जमध्ये स्थान मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या-