शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. आज (१८ जुलै) कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघांमध्ये वनडे मालिकेतील पहिलावहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातून झारखंडचा युवा क्रिकेटपटू इशान किशन आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपली ‘सेंकड इनिंग’ सुरू करू शकतो. अर्थातच ५० षटकांच्या वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. विशेष म्हणजे, आज इशानचा २३ वा वाढदिवस आहे. त्यामुळे जर त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली; तर आजचा खास दिवस त्याच्यासाठी अजूनच खास बनेल. याच निमित्ताने या लेखात आपण त्याच्या कारकीर्दीतील काही रोमांचक गोष्टी जाणून घेऊया.
पटना सोडून रांचीत गिरवू लागला क्रिकेटचे धडे
इशानचा जन्म १८ जुलै १९९८ ला बिहारची राजधानी असलेल्या पटना येथे झाला. इशानचे वडील प्रणव हे बिल्डर आहेत. इशानचा मोठा भाऊ राज किशन हा इशानला लहानपणापासून क्रिकेटसाठी प्रोत्साहित करत आला. इशानचे वडील प्रणव यांनी अवघ्या पाचव्या वर्षी इशानला उत्तम मुजुमदार यांच्या क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. मजुमदार हे इशानवर विशेष मेहनत घेत. दिवसाचा सराव संपल्यानंतरही ते रात्री उशिरापर्यंत इशानला चेंडू टाकून सराव करायला लावत. त्याच क्लबमधील सहप्रशिक्षक संतोष कुमार सांगतात, “मी आणि उत्तमने ज्या वेळी पहिल्यांदा इशानला पाहिले, तेव्हा आम्ही खूप खुश झालो. तो सरळ बॅटने चांगले फटके मारत होता. त्याच्या खेळात आम्हाला गिलख्रिस्टची झलक दिसलेली.”
इशान आपले गृहराज्य असलेल्या बिहारकडून तेरा वर्षाखालील संघात खेळत होता. त्याच सुमारास, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व बिहार क्रिकेट संघटना यांच्यात वाद झाला. त्यामुळे, बीसीसीआयने बिहार क्रिकेट संघटनेवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे बिहारच्या युवा क्रिकेटपटूंची कारकीर्द धोक्यात आली. इशानची क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचे स्वप्न तुटू नये म्हणून, त्याला पुढील प्रशिक्षणासाठी शेजारील राज्य झारखंडला पाठवण्यात आले.
रांचीतील मैदाने गाजवायला केली सुरुवात
भारतीय संघाकडून क्रिकेट खेळायचे हे स्वप्न घेऊन, इशान झारखंडची राजधानी असलेल्या रांचीत पोहोचला. ज्या रांचीच्या मातीने, भारतीय क्रिकेटला एमएस धोनीच्या रूपाने कोहिनूर दिला होता, त्याच रांचीत इशान आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणार होता. इशानने रांचीतील जेके क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. आक्रमक फलंदाज असलेल्या इशानने याचदरम्यान यष्टीरक्षण करण्यास सुरुवात केली. संपूर्ण अकादमीत इशानसारखी फटकेबाजी इतर कोणताही फलंदाज करत नव्हता. बाकीच्या मुलांपेक्षा त्याच्यात विशेष गुण असल्याने, तो भराभर यशाच्या पायऱ्या चढू लागला.
सोळाव्या वर्षी खेळला पहिला प्रथम श्रेणी सामना
इशानच्या आयुष्यात २०१४ हे वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्याने झारखंडकडून प्रथमश्रेणी पदार्पण केले. आपल्या पहिल्या रणजी हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतके काढत, त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. पाठोपाठ, तो विजय हजारे चषकातदेखील चमकला. या देखण्या कामगिरीमुळे त्याला भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघात स्थान मिळाले. २०१६ मध्ये झारखंड विरुद्ध दिल्ली या रणजी सामन्यात त्याने २७३ धावांची जबरदस्त खेळी केली. झारखंडच्या कोणत्याही फलंदाजाकडून केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात उत्तम खेळी आहे. विजय हजारे चषकात ९ सामन्यात त्याच्या बॅटमधून ४०५ धावा निघाल्या.
भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार
इशान किशन या नावाची क्रिकेटप्रेमींना सर्वार्थाने ओळख झाली ती २०१५ च्या डिसेंबर महिन्यात. २०१६ च्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये नियोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व इशानच्या हाती देण्यात आले. इशानने कर्णधार व सलामीवीर अशी दुहेरी भूमिका निभावत संघाला अंतिम फेरीत नेले. अटीतटीच्या अंतिम फेरीत भारताला वेस्ट इंडिजकडून प्रभावाचा सामना करावा लागला. मात्र, इशानच्या नेतृत्त्वगुणांचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी तोंडभरून कौतुक केले.
आयपीएल पदार्पण आणि देशांतर्गत क्रिकेट
विश्वचषकातील कामगिरीनंतर इशानला २०१६ आयपीएलसाठीच्या लिलावात गुजरात लायन्सने ३५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले. इशानने गुजरातकडून दोन हंगाम आयपीएल खेळताना १६ सामन्यात ३१९ धावा बनविल्या. आयपीएलनंतर २०१७-२०१८ च्या हंगामातदेखील त्याने झारखंडसाठी उमदी फलंदाजी केली. सहा रणजी सामन्यात त्याच्या नावापुढे ४८४ धावा होत्या. २०१८-१९ च्या देवधर ट्रॉफी अंतिम सामन्यात शतक झळकावून त्याने ‘भारत क’ संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचवर्षी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीत जम्मू-काश्मीर आणि मणिपूर यांच्या विरुद्ध त्याने सलग सामन्यात शतके ठोकण्याचा पराक्रम केला.
मुंबई इंडियन्सकडून मिळाली संधी
इशानला ओळख मिळवून देण्यासाठी टी२० क्रिकेट आणि आयपीएल योग्य व्यासपीठ ठरले. २०१८ आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांची तगडी किंमत मोजून त्याला आपल्या संघाचा सदस्य बनवला. मुंबईच्या संघात इशान रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बड्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करत होता. इशानसाठी आयपीएलचे २०१८ व २०१९ हे दोन्ही हंगाम संमिश्र गेले. २०१८ मध्ये त्याला १४ सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यात तो २७५ धावा बनवू शकला. त्याने त्या हंगामात २ अर्धशतके देखील झळकावली. २०१९ हे वर्ष त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात खराब वर्षे राहिले. सात सामन्यात तो अवघ्या १०१ धावा या हंगामात काढू शकला. यात त्याची सरासरी १६.१० इतकी मामुली राहिली.
२०२० आयपीएलचा ‘युवराज’
मागील हंगामात अपयशी ठरलेल्या इशानवर मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने २०२० आयपीएलसाठी विश्वास दाखवला. कोरोना महामारीमुळे आयपीएलचा हा हंगाम युएईत आयोजित करण्याचे ठरले. स्पर्धेच्या सुरुवातीला त्याला लहानशी दुखापत झाली. दुखापतीमुळे त्याने पहिले दोन सामने खेळले नाही. या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी तो दुबईच्या मैदानावर उतरला. रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्धच्या या सामन्यात २०२ धावांचा पाठलाग करताना त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत ९९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यांनतर त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. इशानने सातत्य कायम राखत मुंबई इंडियन्सला या हंगामाचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
यानंतर मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर केवळ ४ महिन्यांच्या अंतराने आज कर्णधार धवनने त्याला वनडे स्वरुपातही आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली, तर इशानसाठी त्याचा २३ वा वाढदिवस अविस्मरणीय ठरेल.
वाढदिवस विशेष-
विश्वचषकासाठी स्म्रीतीने दिली नव्हती बारावीची परिक्षा, १७व्या वर्षी नाबाद द्विशतक ठोकत आली चर्चेत