पांढरे केस.. अंगात पांढऱ्या रंगाचे जॅकेट.. हातात चॅनल नाईनचा माईक.. लाघली समालोचन.. परखड टिप्पण्या.. ते बोलायला लागले म्हणजे टेलिव्हिजनवर सामना ऐकणाऱ्या व पाहणाऱ्या प्रेक्षकांचे कान तृप्त होत.. ज्याप्रकारे खेळाडूंचे चाहते असतात व ते त्या खेळाडूप्रमाणे वेशभूषा किंवा केशरचना करून येतात तशाच प्रकारचे चाहते या समालोचकाचे होते.. ज्या समालोचकाने तब्बल पाच दशके समालोचनाने क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य केले.. ज्या समालोचकाला क्रिकेटचा आवाज म्हणून ओळखले जाते त्या समालोचकाचा… त्या रिची बेनोंचा आज वाढदिवस..
रिची बेनो यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी ऑस्ट्रेलियातील पेनरिथ येथे एका क्रिकेटप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील लुईस हे फ्रेंच शाळेत शिक्षक होते. त्यांनी एकदा एका स्थानिक सामन्यात सर्व २० बळी घेण्याची विलक्षण कामगिरी केली होती. रिची यांचे धाकटे भाऊ जॉन हेसुद्धा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघात खेळले.
आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज, लेगस्पिन गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची कौशल्य लवकर दिसून आली. ते अठराव्या वर्षी न्यू साउथ वेल्सकडून तर ऑस्ट्रेलियाकडून २१ व्या वर्षी खेळू लागले. कारकीर्दीच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण कामगिरी न करता आल्याने त्यांना वगळण्यात आले होते. इंग्लंडचे कर्णधार लेन हटन, बेनो यांना “फेस्टिव्हल क्रिकेटर” म्हणून संबोधत असत. हटन यांचे म्हणणे होते की, बेनो हे एक मनोरंजन करणारे क्रिकेटपटू नक्कीच आहेत मात्र, त्यांच्याकडे एक चांगला क्रिकेटपटू बनण्याची कौशल्ये नाहीत.
सन १९५०च्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या सर्व टीकाकारांची तोंडे आपल्या कामगिरीने बंद केली. आपल्या जादुई लेगस्पिन गोलंदाजीने, बेनो यांनी १९५६ मध्ये भारत आणि १९५८ मध्ये दक्षिण आफ्रिका मालिकांत वर्चस्व गाजवले आणि त्यानंतर १९५८-५९ च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या ऍशेसमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नील हार्वे यांच्यासारखा वरिष्ठ खेळाडू संघात असतानाही, त्या ऍशेसमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाचे कर्णधार बनवण्यात आले होते.
बेनो यांच्या बुद्धिमत्ता आणि ऊर्जेचा फायदा केवळ ऑस्ट्रेलियाच्या संघालाच नव्हे, तर सुस्त व बचावात्मक असलेल्या क्रिकेटमध्ये आक्रमकता आणण्यासाठी झाला. वेस्ट इंडीजचे पहिले कृष्णवर्णीय कर्णधार फ्रँक वॉरेल यांच्या स्मरणार्थ खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धची १९६०-६१ ची मालिका अत्यंत चुरशीची झाली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ असा विजय मिळविला होता. त्या दौऱ्यावेळी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची व बेनो यांची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानावर गर्दी करत.
बेनो हे मैदानावर अत्यंत सक्रिय असत. सतत गोलंदाजांना सूचना देणे तसेच विरुध्द संघाचा फलंदाज बाद झाल्यास, आवेशपूर्ण प्रतिक्रिया देण्यात ते आघाडीवर असत. इतर वेळी मात्र ते शांत, संयमी राहत. तसेच हलकेफुलके विनोद करण्यात त्यांचा हातखंडा होता.
कर्णधार म्हणून एकही मालिका न गमावणाऱ्या बेनो यांनी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बेनो यांनी आपल्या कारकीर्दीत ६३ कसोटी सामन्यात २४८ बळी घेतले होते. कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा आणि २०० बळी मिळविणारा ते जगातील पहिले खेळाडू ठरले होते. २८ कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना त्यांनी १२ सामन्यात विजय मिळवले होते.
साल १९६४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, बेनो यांनी पूर्णवेळ क्रिकेट पत्रकारिता व समालोचक म्हणून काम सुरू केले. सुरुवातीला अनेक वर्ष ते बीबीसी व नंतर चॅनल नाईन यांच्यासाठी समालोचन करत. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी, एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते, कदाचित मी आत्तापर्यंत ५०० कसोटी समालोचक म्हणून पाहिल्या आहेत. क्रिकेटपटूंच्या अधिकारांसाठी त्यांनी कॅरी पॅकर यांच्या ‘वर्ल्ड सिरीज क्रिकेट’ ला पाठिंबा दर्शवला होता. त्यांचे म्हणणे होते की, क्रिकेटपटूंना अधिक मानधन मिळायला हवे.
समालोचन करताना बेनो कायम चेहऱ्यावर क्रीम लावत तसेच अंगात पांढरे जॅकेट असत. हा चॅनेल नाईनचे मालक कॅरी पॅकर यांच्यासारखा पेहराव घालण्याची परवानगी फक्त बेनो यांना होती. बेनो समालोचन करताना कायम परखड भाष्य करत. चॅपेल बंधूंनी अंडरआर्म चेंडू टाकून सामना जिंकल्यामुळे, त्रासलेल्या बेनो यांनी त्यांना खिलाडूवृत्ती व राष्ट्रप्रेमाचे धडे भर पत्रकार परिषदेत दिले होते. शेन वॉर्नने माइक गेटिंगला बाद करताना टाकलेला चेंडू ‘शतकातील सर्वात्तम चेंडू’ होता हे बेनो यांनी जाहीर केले होते.
इंग्लंडचे माजी खेळाडू आणि जगप्रसिद्ध क्रीडा भाष्यकार जोनाथन ऍग्न्यू म्हणतात, “तुम्ही कोणत्याही क्रीडा भाष्यकारास त्याच्या आदर्शाविषयी विचाराल तर तो बेनो यांचेच नाव घेईल. बेनो हे समालोचन क्षेत्रातील दीपस्तंभ होते. त्यांच्या आसपासही कोणी जाऊ शकत नाही.”
जवळपास पन्नास वर्ष समालोचन केलेल्या बेनो यांना २०१४ मध्ये त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. याच आजारातून ते पूर्ण बरे होऊ शकले नाहीत व २०१५ ला वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: पहिल्या वनडेवर पावसाचे सावट! सामन्याला होणार उशिर?
क्रिकेटचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलेला मॉर्ने मॉर्केल, जाणून घ्या खास १० गोष्टी