आज भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा वाढदिवस. तसंतर राजकारण आणि क्रिकेट यांचा खूप नजीकचा संबंध आहे. अनेक क्रिकेट संघटनांमध्ये राजकारण्यांचे वर्चस्व असलेले आपण पाहतो. भारतीय राजकारणातील एक मोठे नाव असलेल्या शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. मनमोहन सिंह यांचा क्रिकेटची तसा सरळ संबंध आला नाही मात्र, त्यांनी ‘क्रिकेट डिप्लोमसी’ द्वारे अनेकदा क्रिकेटच्या माध्यमातून दोन देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले गेलेले दिसून येतात.
भारत आणि पाकिस्तान या सख्खे शेजारी मात्र, कायम तणावपूर्ण संबंध असलेल्या देशांत क्रिकेट एकसारखेच पसंत केले जाते. त्याच अनुषंगाने, जेव्हा केव्हा दोन्ही देशांमधील तणाव टोकाला जातो, त्यावेळी क्रिकेटला दुवा बनून दोन्ही देश चर्चा करताना दिसून आलेले आहेत. १९८७ मध्ये, दोन्ही देशांदरम्यान युद्धाची परिस्थिती बनत असताना, पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद जिया उल हक यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानचा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी भारताचा दौरा केला होता.
कारगिल युद्धानंतर, भारत व पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट बंद झाले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेत भारतीय संघाला पाकिस्तानचा दौरा करण्यास परवानगी दिली. भारतीय संघ पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी त्यांनी संघाची भेट घेत सदिच्छा देखील दिल्या होत्या.
भारत-पाकिस्तान दरम्यानचे संबंध क्रिकेटच्या माध्यमातून सुधारण्यासाठी २००४ मध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने वारंवार पुढाकार घेतला. त्यात पंतप्रधान मनमोहन सिंह यांची निर्णायक भूमिका होती.
२००५ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारत-पाकिस्तान दरम्यानचा कसोटी सामना पाहण्यासाठी मनमोहन सिंह यांनी आमंत्रित केले. मुशर्रफ सामना पाहण्यासाठी आले असले तरी, त्या छोटेखानी दौऱ्याचे रूपांतर शिखर संमेलनात झाले. दोन्ही नेत्यांनी कायम वादग्रस्त ठरत असलेल्या काश्मीर मुद्द्यावर चर्चा करत, सीमारेषा खुले करण्याचे आश्वासन एकमेकांना दिले होते. त्यावेळी, राजकीय संघर्ष टाळण्यासाठी क्रिकेटचा अतिशय खुबीने वापर या दोन्ही नेत्यांनी केला होता.
२००६ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असता, मुशर्रफ यांनी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंह यांना एक सामना पहायला येण्याची विनंती केली होती. मात्र, मनमोहन सिंह यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते त्यावेळी पाकिस्तानला जाऊ शकले नाहीत. सिंह यांनी अत्यंत नम्रपणे “पुन्हा कधीतरी नक्की येईल” असे म्हणतात मुशर्रफ यांना नकार कळवला होता.
२००८ मध्ये मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानचे संबंध पुन्हा बिघडले. २६/११ च्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्यात १६६ भारतीय नागरिक मारले गेले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानी संघटनांचा तसेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा हात असल्याचे पुरावे देखील मिळाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर, भारत व पाकिस्तान दरम्यान कोणत्याही प्रकारचा सामना खेळवला गेला नाही. अशातच, २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर देखील गोळीबार करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही संघाने पाकिस्तानचा दौरा न करण्याचे ठरवले. २०११ विश्वचषक स्पर्धेचे सहयजमान पद देखील पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले होते.
२०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत व पाकिस्तान आमनेसामने आले. हा सामना पाकिस्तानपासून जवळच असलेल्या, पंजाबमधील मोहाली येथे आयोजित करण्यात येणार होता. याच सामन्याचे औचित्य साधून भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना हा सामना पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. दोन्ही देशांमधील ताणले गेलेल्या संबंधांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून मिटवण्याचे प्रयत्न या ‘क्रिकेट डिप्लोमसी’ द्वारे करण्यात येणार होते. “मोहाली स्पिरिट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे हा प्रमुख उद्देश होता.
क्रिकेट सामन्या दरम्यानच्या चर्चेत बरेच प्रमुख मुद्दे चर्चिले गेले. पाकिस्तानातील मूलभूत प्रश्न तसेच दहशतवाद यावर सविस्तर चर्चा झाली. पाकिस्तानी पंतप्रधान गिलानी हे दहशतवाद्यांविरोधात आपले सरकार काय कार्य करत आहे हे तितकेसे प्रभावीपणे सांगू शकले नाहीत. भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गिलानी यांना स्पष्टपणे सांगितले की,
“दोन्ही देशातील संबंधात सुधार हवा असेल तर, पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका घेतलीच पाहिजे.”
या बैठकीच्या शेवटी गिलानी यांनी मनमोहन सिंह यांना पाकिस्तान भेटीचे आमंत्रण दिले. तसेच भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
“मोहाली स्पिरिट” चा सारांश सांगताना भारताच्या परराष्ट्र सचिव निरुपमा राव म्हटल्या,
“दोन्ही नेत्यांमधील चर्चा सकारात्मक झाली आहे. दोन्ही देशातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल तसेच, वादग्रस्त मुद्दे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी करण्यात येईल. दोन्ही देशातील संबंध व्यापक व सहकार्याचे होण्यासाठी निग्रहपूर्वक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.”
या चर्चेनंतर २०१३ मध्ये पाकिस्तान संघाने भारताचा दौरा केला होता. दोन्ही देशात क्रिकेटला अफाट लोकप्रियता असल्याने, भविष्यात देखील क्रिकेट डिप्लोमसी च्या मार्गाने दोन्ही देशातील वादाचे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही सरकारे करू शकतात.
वाचा-‘असा’ कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी