वेगवान गोलंदाजी खेळणे हे अनेक फलंदाजांसाठी अवघड काम असले तरी, अत्युच्च दर्जाची वेगवान गोलंदाजी क्रिकेट चाहत्यांना वेगळाच अनुभव देऊन जाते. १९३०-१९४० च्या दरम्यान इंग्लंडच्या सर फ्रेडी ट्रुमन यांची घातक गोलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानावर गर्दी करायचे. वेस्ट इंडीजच्या उंचपुर्या आणि फलंदाजांना भयभीत करणाऱ्या जोएल गार्नर, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, कॉलीन क्रॉफ्ट, माल्कम मार्शल यांच्या गोलंदाजीचा सामना करणे; जगातील सर्वात अवघड काम वाटायचे. जेफ थॉमसन आणि डेनिस लिली हे देखील आपल्या वेगासाठी प्रसिद्ध होते. आधुनिक क्रिकेटमध्ये ब्रेट ली, शॉन टेट, मिचेल जॉन्सन या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेकांचा थरकाप उडवला. न्यूझीलंडचा शेन बॉण्ड व पाकिस्तानचा शोएब अख्तर हे तर निव्वळ आपल्या वेगासाठी प्रसिद्ध होते. सध्या मिचेल स्टार्क व जोफ्रा आर्चर यांनाच अस्सल वेगवान गोलंदाज म्हणता येऊ शकते. मात्र, युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात एक असा खेळाडू दिसून आला; ज्याने खरी वेगवान गोलंदाजी काय असते याचे सप्रमाण सादरीकरण केले. दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘सरप्राईज पॅकेज’ ठरलेला हा गोलंदाज म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा एन्रीच नॉर्किए.
वोक्सवॅगनचा सर्वात मोठा कारखाना आहे त्याच्या गावात
ऍलन डोनाल्ड यांच्यानंतर डेल स्टेन याला दक्षिण आफ्रिकेत सर्वात वेगवान गोलंदाज मानले गेले होते. मात्र, स्टेनने अशा वेगाने गोलंदाजी केली की, तो डोनाल्ड यांच्यापेक्षा वेगवान गोलंदाज ठरला. स्टेन ज्याप्रकारे दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण भागातून पुढे आला; त्याचप्रकारे एन्रीच नॉर्किएने देखील एका छोट्याशा शहरातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पोर्ट एलिझाबेथपासून उत्तरेला असलेल्या उटेनहेग याठिकाणी नॉर्किएचा जन्म झाला. उटेनहेग याच ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा वोक्सवॅगन या मोटार कंपनीचा कारखाना आहे. नॉर्किएने ब्रॅडवॅग या ठिकाणी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नेल्सन मंडेला मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी याठिकाणी नॉर्किएचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्याने आर्थिक नियोजन या विषयात पदवी मिळवली आहे.
उशिराने केली क्रिकेट खेळायला सुरुवात
क्रिकेट सुरवातीला नॉर्किएचा आवडता खेळ नव्हता. मात्र, महाविद्यालयात असताना तो क्रिकेटकडे आकर्षित झाला आणि त्याने गंभीरतेने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. नॉर्किएने महाविद्यालयाच्या संघातूनच आपल्या गोलंदाजी कौशल्यांना पैलू पाडण्याचे काम केले.
नॉर्किएने क्रिकेट खेळायला उशिराने सुरुवात केली असली तरी, त्याच्या प्रगतीचा वेग त्याच्या गोलंदाजी सारखाच होता. २०१२-२०१३ च्या देशांतर्गत हंगामात ईस्टर्न प्रोविन्स संघात त्याची निवड झाली. मात्र, तो दुखापतग्रस्त झाला. दुखापतीतून लवकर बरा न झाल्याने; ईस्टर्न प्रोविन्सने त्याच्या सोबत असलेला करार रद्द केला. नॉर्किएला पुन्हा एकदा ईस्टर्न प्रोविन्स संघात स्थान मिळवण्यासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागली. २०१६ च्या आफ्रिका टी२० कपमध्ये त्याला संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यात त्याच्या गोलंदाजीची धूलाई झाल्याने, त्याला संघातून वगळण्यात आले. पुढे, ईस्टन प्रोविन्स संघाने ती स्पर्धा जिंकली.
दुखापतीमुळे कारकिर्दीत हुकल्या अनेक महत्त्वाच्या संध्या
नॉर्किएने २०१६-२०१७ च्या हंगामात प्रथमश्रेणी पदार्पण करताना; अवघ्या चार सामन्यात २० बळी मिळवत दमदार सुरुवात केली. २०१७-२०१८ च्या प्रथमश्रेणी हंगामात देखील तो सर्वाधिक बळी मिळवणारा दुसरा वेगवान गोलंदाज होता. प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवले असले तरी, त्याला खरी ओळख मिळाली ती टी२० क्रिकेटमुळे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील मझान्सी सुपर लीग या टी२० स्पर्धेच्या पहिल्या हंगामात त्याला केपटाऊन ब्लीटझकडून खेळण्याची संधी मिळाली. नॉर्किएला केपटाऊन ब्लीटझने तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम देऊन आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, घोट्याच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धला मुकला. २०१९ आयपीएलसाठी कोलकत्ता नाइट रायडर्सने २ कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. मात्र, स्पर्धेच्या आधी खांद्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेत खेळू शकला नाही.
लहानशी आंतरराष्ट्रीय कारकीर्द
नॉर्किएला मार्च २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध ३ मार्च २०१९ रोजी जोहान्सबर्गमधील वॉडरर्स स्टेडियमवर त्याने आपला एकदिवसीय सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पुढे श्रीलंकेचा डाव ४७ षटकात २३१ धावात संपुष्टात आला. नवख्या नॉर्किएने त्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी करत; सात षटकात ३३ धावा देऊन एक गडी बाद केला. अशी आकडेवारीसह माघारी परतले. दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक आणि फाफ डु प्लेसिस यांच्या १६६ धावांच्या भागीदारीमुळे सहज सामना आपल्या नावे केला.
इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ क्रिकेट विश्वचषकात सहभागी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडकडे प्रयाण करण्यापूर्वी नॉर्किएच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. विश्वचषकानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघातून त्याने टी२० पदार्पण केले. भारताविरुद्धच तो आपला पहिला कसोटी सामना देखील खेळला.
कोरोना महामारीनंतर सुरु झालेल्या, कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट लुसिया झुक्स संघाशी तो करारबद्ध झाला. परंतु, लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने, तो वेस्टइंडीजमध्ये दाखल होऊ शकला नाही. जूलै २०२० मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याला ‘२०१९ वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू’ म्हणून सन्मानित केले.
ऐनवेळी मिळालेल्या संधीचे केले सोने; बनला २०२० आयपीएलचा सर्वात चर्चिला गेलेला खेळाडू
आयपीएल २०२० च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला करारमुक्त केले. त्यानंतर लिलावात देखील त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. पुढे ढकलली गेलेली आयपीएल युएईमध्ये खेळवली जाणार असल्याचे, निश्चित झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने स्पर्धेतून माघार घेतली. स्पर्धेला एक आठवडा शिल्लक असताना, दिल्ली संघ व्यवस्थापनाने नॉर्किएला संधी देण्याचे निश्चित केले.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्लीच्या संघात वेगवान गोलंदाजीत फक्त कागिसो रबाडाचे विश्वसनीय नाव दिसत होते. नॉर्किएने रबाडाच्या साथीला येत दिल्लीच्या वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळली. दक्षिण आफ्रिकेच्या या दोन्ही गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांच्या नाकीनऊ आणले. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नॉर्किएने एका षटकात प्रत्येक चेंडू १५० किमी/प्रतितास इतक्या वेगाने टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जोस बटलरला टाकलेला १५६.२२ किमी/प्रतितास वेगाचा चेंडू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. त्याच षटकातील इतर दोन चेंडूदेखील आयपीएल इतिहासातील क्रमांक दोन व क्रमांक तीनचे वेगवान चेंडू ठरले. नॉर्किएने स्पर्धेत आत्तापर्यंत १५ सामने खेळताना २० बळी मिळवत; कागिसो रबाडाला सुयोग्य साथ दिली आहे. पहिल्याच आयपीएलमध्ये त्याची कामगिरी पाहून; अनेक माजी खेळाडूंनी त्याचे कौतुक केले.
नॉर्किएला मोडायचा आहे शोएब अख्तरचा विश्वविक्रम
शोएब अख्तरने टाकलेला १६१.३ किमी/प्रतितास वेगाचा चेंडू क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू मानला जातो. नॉर्किएने अख्तरचा हा विश्वविक्रम मोडण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे. सध्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरसमवेत नॉर्किएला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज मानले जाते. मात्र, डेल स्टेनला आदर्श मानणाऱ्या नॉर्किएने वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.
दिल्ली कॅपिटल्सला आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवायचे असल्यास, नॉर्किएला अखेरच्या वेळी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीने नामोहरम करावे लागेल.
वाचा-
-क्रिकेटर असलेल्या पोराला दुखापत झाली म्हणून अल्पभूधारक शेतकरी बापाने विकली होती जमीन