क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी, खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीलाही तितकेच महत्त्व असते. एक-एक खेळाडू मिळूनच संघ तयार होत असतो. फलंदाजी करताना खेळाडू वैयक्तिक विक्रम करत असतात मात्र; यात त्यांच्या जोडीदाराचाही काही अंशी वाटा असतो. एक चांगली भागीदारी संघाला चांगली धावसंख्या उभारून देत असते. भागीदारीचे जितके महत्त्व फलंदाजीत आहे; तितकेच महत्त्व गोलंदाजीत देखील आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅकग्रा- ब्रेट ली, भारताची फिरकी दुकली अनिल कुंबळे-हरभजन सिंह तसेच इंग्लंडचे जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड हे सर्व गोलंदाज भागीदाराने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत आले आहेत. याच जोड्यांप्रमाणे, वेस्ट इंडीजच्या एका वेगवान जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. त्यातील एक होते कर्टली अंब्रोज आणि दुसरे होते कर्टनी वॉल्श.
एका डावात १० बळी घेण्याची कामगिरी
जमैका येथे ३० ऑक्टोबर १९६२ ला जन्मलेले वॉल्श लहानपणापासून आजूबाजूला क्रिकेट पाहत होते. मायकल होल्डिंग ज्या मेलबर्न क्रिकेट क्लबसाठी खेळलेले, त्याच क्लबपासून वॉल्श यांनी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात दहा बळी घेण्याचा विक्रम केला आहे. असाच विक्रम वॉल्श यांनी शालेय क्रिकेटमध्ये केलेला. वयाच्या सतराव्या वर्षी एक्सेलसर स्कूलसाठी त्यांनी ही कामगिरी केली होती. याच कामगिरीमुळे त्यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. वॉल्श यांनी आपल्या गोलंदाजी कौशल्यामुळे, अवघ्या १९ व्या वर्षी पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला.
दिग्गज त्रयींसोबत पदार्पण
वॉल्श यांनी बाविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. जोएल गार्नर, मायकल होल्डिंग आणि माल्कम मार्शल यांच्या सोबतीने चौथा वेगवान गोलंदाज म्हणून ते पर्थच्या मैदानावर उतरले. वेस्ट इंडिजसाठी पहिली चार वर्षे त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन संघासह श्रीलंका, न्यूझीलंड व इंग्लंड दौरा त्यांनी गाजवला. १९८६-१९८७ च्या भारत दौऱ्यात त्यांनी तीन कसोटीत २६ बळी मिळवण्याची कामगिरी गेली.
अबब ! एक धाव पाच बळी
श्रीलंकेविरुद्ध डिसेंबर १९८६ मध्ये शारजाह येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान वॉल्श यांनी अवघ्या एका धावेत पाच बळी मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. वेस्ट इंडिजने १९३ धावांनी जिंकलेल्या या सामन्यात, त्यांचा पाचवा गोलंदाज म्हणून वापर करण्यात आलेला. त्यानंतर, त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण होते. ४.४-३-१-५. आजही वॉल्श यांच्याच नावे सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम आहे.
खिलाडूवृत्तीचे अनुकरणीय उदाहरण आणि अजब हॅट्रिक
१९८७ विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेशासाठी, एका चेंडूत दोन धावांची आवश्यकता होती. तर, दुसरीकडे वेस्ट इंडिजला अवघा एक बळी मिळवायचा होता. त्यावेळी त्यांनी अनेक पावले पुढे गेलेल्या सलीम जाफर यांना ‘मंकडींग’ पद्धतीने बाद केले नाही. अब्दुल कादिरने अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला; मात्र वॉल्श यांच्या खिलाडूवृत्तीवर क्रिकेटजगत खुश झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या १९८८-८९ च्या दौऱ्यावर एक अनोखी हॅट्ट्रिक त्यांनी घेतली. ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात त्यांनी टोनी डोलमेड यांना तर, दुसऱ्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर माइक वेलेटा आणि ग्रॅम वूड यांना बाद करत, आगळी-वेगळी हॅट्रिक आपल्या नावे केली.
वॉल्श यांना १९९४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे कर्णधार बनवण्यात आले. त्याच वर्षी भारत दौऱ्यावर आले असता, मनोज प्रभाकरला टाकलेला चेंडू हेल्मेटवर आढळल्याने मनोजचे नाक फुटले होते. याच दरम्यान त्यांची कर्टली अंब्रोज यांच्याशी चांगली भट्टी जुळून आली. आपल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने त्यांनी जगभरातील फलंदाजांना त्रस्त करून सोडले. दोघांनी ४९ कसोटीत एकत्रित गोलंदाजी करताना ४२१ फलंदाज तंबूत धाडले. कर्टली व कर्टनी ही जोडी ‘टू सी’ या टोपण नावाने प्रसिद्ध झालेली.
कारकिर्दीच्या उत्तरार्धात चढली गोलंदाजीला धार
वॉल्श यांच्या गोलंदाजीला, वयासोबत आणखी धार चढली. १९९८ मध्ये त्यांनी, माल्कम मार्शल यांचा ३७६ कसोटी बळींचा विक्रम मागे सोडला. सन २००० मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी, एका वर्षात ६६ बळी मिळवले होते. वॉल्श हे १९९५ ते १९९८ यादरम्यान ग्लुसेस्टरशायर साठी काउंटी क्रिकेट खेळले. आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ५०० बळी मिळवणारे गोलंदाज वॉल्श होते. न थकता मोठे मोठे स्पेल टाकण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, त्यांना ‘ड्युरासेल’ असे संबोधले जात.
‘स्लो यॉर्कर’चे जनक
वॉल्श सन २००१ यावर्षी अखेरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. सध्या प्रचलित असलेला, ‘स्लो यॉर्कर’ चेंडू त्यांनी, आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस सन २००० मध्ये शोधून काढला होता. आपल्या जवळपास १७ वर्षाच्या कारकिर्दीत वॉल्श यांनी १३२ कसोटीत ५१९ तर २०५ एकदिवसीय सामन्यात २२७ बळी आपल्या नावे केले. संपूर्ण कारकिर्दीत पाच हजार हून जास्त षटके त्यांनी गोलंदाजी केली. वॉल्श यांनी आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये ३०,०१९ चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे.
खराब फलंदाजीसाठी कुप्रसिद्ध
गोलंदाजीतील अनेक विक्रम नावावर असलेले वॉल्श आपल्या खराब फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांच्या नावे कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे. ते तब्बल ४३ वेळा खाते न उघडता बाद झाले आहेत. योगायोगाने, ६१ वेळा नाबाद राहण्याची कामगिरी देखील त्यांनी केली आहे. त्यांची फलंदाजीची सरासरी अवघी ७ राहिली.
निवृत्तीनंतर, वॉल्श वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य झाले. २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. सध्या त्यांच्याकडे, वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिताली राज करतेय नव्या क्षेत्रात पदार्पण! मुहूर्तही ठरला
‘असे’ कर, भारतीय संघाचे नशीब बदलशील! रिषभ पंतला चाहत्याचा भन्नाट सल्ला