आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेट खेळण्याला सुरूवात होऊन, आता ८० वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. २००० नंतर, महिला क्रिकेटकडे लोकांचा काहीसा कल वाढू लागला. प्रत्येक देशातील दोन-चार महिला क्रिकेटपटू सोडल्या तर इतर महिला क्रिकेटपटूंविषयी कोणाला जास्त माहीती नव्हती. भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही मिताली राज, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी अशी काही मोजकीच नावे पाठ होती. मात्र, २०१७ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेद्वारे क्रिकेटप्रेमींना अनेक प्रतिभावंत महिला क्रिकेटपटुंची ओळख झाली. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने केलेल्या चमकदार कामगिरीनंतर, भारतीय महिला क्रिकेटची एक संपूर्ण पिढीच प्रकाशझोतात आली. भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात एका मुंबईकर मुलीचा सिंहाचा वाटा होता. सलामीला येत, संघाचा डाव विणायची जबाबदारी तिच्यावर होती व तिने ती जबाबदारी समर्थपणे पेलली. ही भारतीय संघाचा एक स्तंभ असलेली मुंबईकर सलामीवीर होती पूनम राऊत.
धोत्याच्या बॅटने तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली
सिंधुदुर्गमधील गडमठ राऊतवाडी या गावचे रहिवासी असलेले गणेश राऊत मुंबईमध्ये कामानिमित्त कुटुंबासह मुंबईतील प्रभादेवी चाळीत राहायला आले. गणेश हे आधी टेनिस बॉल क्रिकेट खेळत. सुविधांचा अभाव व परिस्थितीमुळे त्यांना क्रिकेटमध्ये कारकीर्द करता आली नाही. गणेश हे ड्रायव्हर म्हणून काम करत. लहानगी पूनम टेलिव्हिजनवर क्रिकेट पाहत. वयाच्या सातव्या वर्षी कपडे धुतात त्या धोत्याला बॅट समजून ती क्रिकेट खेळू लागली. इतर मुलांसोबत ती क्रिकेट खेळत असत. तिच्या वडिलांनाही आपली मुलगी उत्तम क्रिकेट खेळते, हे पाहून कौतुक वाटत. लहानपणापासून क्रिकेटर व्हायचे पूनम राऊतचे स्वप्न होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची टेलिव्हिजनवर फलंदाजी पाहत ती क्रिकेट शिकू लागली होती.
वडिलांच्या बॉसने क्रिकेट किटसाठी केली मदत
बोरिवलीला राहायला गेल्यावर आपल्या लहान भावासोबत पूनम क्रिकेट खेळायची. गल्लीतल्या मुलांसोबतच खेळताना तिला तीन-चार ओव्हर फलंदाजीची संधी मिळायची. एक दिवस वडिलांनी ठरवले की, पूनमला चांगले क्रिकेट शिकवायचे. त्यांनी तिला, समर कॅम्पमध्ये पाठवले. पूनमने सीजन बॉल क्रिकेटचे धडे त्याच समर कॅम्पमध्ये पहिल्यांदा गिरवले. त्यानंतर शिवसेवा क्रिकेट अकादमीत पूनमने खेळायला सुरुवात गेली. पूनमला ज्यावेळी नवीन क्रिकेट किट घ्यायचे होते, त्यावेळी गणेश यांच्याकडे पैसे नव्हते. गणेश यांचा बॉस असलेल्या अमेरिकन माणसाने त्यावेळी गणेश यांना दहा हजाराची मदत केली होती. शिवसेवा अकादमीत त्यावेळी फक्त मुले खेळायची. त्यामुळे पुनम पाच वर्षे मुलांसोबतच क्रिकेट खेळली. पूनमचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांनी पूनमचे ऍडमिशन माटुंग्यातल्या महिला क्रिकेट अकादमीत केले. त्यानंतर पूनमने मुलींसोबच सराव करायला सुरुवात केली. माटुंग्यातील अकादमीत पूनमने खऱ्या अर्थाने क्रिकेट जगायला सुरुवात केली.
पूनमने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुलगी क्रिकेट खेळणार? मुली क्रिकेट कुठे खेळतात?अशा अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र, पूनमने त्याकडे दुर्लक्ष केले. पूनम क्रिकेटमुळे मैत्रीणींत मिसळत नसत. अभ्यास, शाळा आणि क्रिकेट हेच तिचे जग होते. शालेय क्रिकेट गाजवू लागल्यानंतर पूनमचे मुंबई क्रिकेट वर्तुळात नाव होऊ लागले.
तर, ती मुंबईच्या मुलांचे संघाकडून खेळली असती
पूनमच्या कष्टाचे चीज तेव्हा झाले जेव्हा, सर्वप्रथम तिची निवड मुंबईच्या चौदा वर्षाखालील व नंतर एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघात झाली. पुनम बाबतीत एक मजेदार किस्सा तिचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांनी सांगितला होता,
“पूनमची निवड मुंबईच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघात झाली असती, इतकी ती उत्तम क्रिकेट खेळत. पूनम कायम मुलांसारखी केस रचना करत असल्याने व फटके देखील ताकतीने खेळल्याने निवडकर्ते असलेल्या अनिल मुजुमदार यांना वाटले, ती मुलगा आहे. मुजुमदार यांनी तिला संघात घेण्याचे निश्चित केले. मात्र, त्यांनी तिला नाव विचारले तेव्हा तिने पूनम असे सांगताच ते अवाक् झाले. त्यांनी तिला शाबासकी देत आशीर्वाद देखील दिला.”
पूनमचा खेळ पाहून, रेल्वेने तिला वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच, नोकरीचा प्रस्ताव दिला. मुंबईमध्ये क्रिकेटचे धडे गिरवलेली पूनम, रेल्वेकडून खेळणार होती. पहिल्या वर्षातच देखणी कामगिरी करत तिने २००९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर, भारतीय संघातील सलामीची जागा पूनमने आपल्या नावे केली. २०१३ ला भारतात झालेल्या महिला विश्वचषकात ती भारतीय संघाची सदस्य होती. पूनमने २०१४ ला इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण देखील केले.
अविस्मरणीय २०१७ विश्वचषक मोहीम
पूनमने १५ मे २०१७ ला आयर्लंडविरुद्ध दीप्ती शर्मासोबत सलामीला उतरत, पहिल्या विकेटसाठी विश्वविक्रमी ३२० धावा जोडल्या. जवळपास नऊ वर्ष भारतीय संघाकडून खेळत असलेल्या, पूनमला खरी ओळख मिळाली ती २०१७ महिला क्रिकेट विश्वचषकात. युवा आक्रमक फलंदाज स्मृती मंधानासोबत सलामीला येत, आपल्या भक्कम बचाव व तंत्रशुद्ध फलंदाजीने तिने सर्वांना मोहित केले. इंग्लंड विरूद्धच्या पहिल्याच साखळी सामन्यात तिने ८६ धावांची झुंजार खेळी केली. पाकिस्तान विरुद्ध ४७ तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक तिच्या बॅटमधून आले. अंतिम सामन्यात प्रमुख फलंदाज बाद होत असताना, पूनमने एकहाती किल्ला लढवत, ८६ धावा बनवून विश्वचषक भारताला मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. भारत अवघ्या ९ धावांनी अंतिम सामना हरला.
विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी, पुढे भारतीय संघ निश्चित विश्वचषक जिंकेल. असा आशावाद पूनमने व्यक्त केला होता. पूनमने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी, ५३ एकदिवसीय व ३५ टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यात तिच्या खात्यावर अनुक्रमे १,५६७ व ७१९ धावा आहेत.
आयपीएल संपल्यानंतर युएईत खेळल्या जाणाऱ्या वुमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत ती ४ नोव्हेंबरपासून खेळताना दिसेल.