ऑफ स्पिन.. क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीनंतर ज्याप्रकारे सर्वाधिक गोलंदाजी केली जाते तो गोलंदाजीचा प्रकार म्हणजे ऑफ स्पिन.. जिम लेकर, इरापल्ली प्रसन्ना, सकलेन मुश्ताक, हरभजन सिंह या ऑफ स्पिन गोलंदाजांनी शेकडो विकेट मिळवत, क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले. सध्याचे आर. अश्विन व नॅथन लायन हे कसोटी क्रिकेट गाजवत, या दिग्गजांच्या पंक्तीत सामील व्हायचा प्रयत्न करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील ऑफस्पिनर म्हणजे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनच आहे. मात्र, मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवेपर्यंत सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर कोण होते ? याचे उत्तर बऱ्याच जणांना सांगता येणार नाही. अनेक जण जिम लेकर यांचे नाव घेतील, मात्र जिम लेकर हे सर्वार्थाने सर्वात्तम ऑफस्पिनर मानले जात नव्हते. आकडेवारी व कौशल्य या दोन्ही परिमाणात बसणारे पहिले ऑफस्पिनर होते वेस्टइंडीजचे लान्स गिब्स.
जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदांच्या ताफ्यासाठी व आक्रमक फलंदाजांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेटने फिरकीचा हा कोहिनूर जगाला दिला होता. वेस्ट इंडीजची जगप्रसिद्ध वेगवान चौकडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल होण्यापूर्वी गिब्स यांनी वेस्टइंडीज गोलंदाजीचे नेतृत्व केले होते. गिब्स हे वेस्ट इंडिजच नव्हे जागतिक क्रिकेटमधील सर्वात्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक होते, यात कोणतीच शंका नाही.
अगदी लहान वयात वडिलांचे निधन झाल्याने, लान्स त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी व्यवसायिक क्रिकेटकडे वळण्याचे मन बनवले. लेगस्पिनर म्हणून क्रिकेटची सुरुवात करणारे लान्स इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक आर्थर मॅकींटायर यांच्या सल्ल्यानुसार, ऑफ स्पिन गोलंदाजी करू लागले. मॅकींटायर त्यावेळी गयाना येथे प्रशिक्षक होते. लान्स हे लेगस्पिनर म्हणून चेंडू वळवत, पण गुगली टाकायला त्यांना अपयश येत. ऑफ स्पिन गोलंदाजी करू लागल्यानंतर, लान्स त्यांच्या गोलंदाजीत अधिक नियंत्रण आणि भिन्नता आली.
१९५३-५३ च्या हंगामात गिब्स यांनी ब्रिटीश गयानाकडून एमसीसीविरूद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच डावात त्यांनी ५१ धावा देऊन ३ बळी मिळवले. त्यावेळच्या उत्कृष्ट फलंदाजांत समाविष्ट असलेल्या, डेनिस कॉम्प्टन यांना त्रिफळाचीत करण्याची किमया गिब्स यांनी केली होती. ब्रिटिश गयाना संघाकडून नियमितपणे खेळल्याने व चांगली कामगिरी केल्याने त्यांची निवड, पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी करण्यात आली. पोर्ट ऑफ स्पेन येथील दुसऱ्या कसोटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात चार बळी मिळवत, त्यांनी उर्वरित मालिकेसाठी आपली जागा निश्चित केली.
१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला, गिब्स हे आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होते. भारताविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत त्यांनी, पाच सामन्यात २४ बळी मिळवले. ब्रिजटाऊन येथील कसोटीत त्यांनी भारताचा डाव १४९-२ वरून सर्वबाद १८७ असा गुंडाळला. त्यांनी अवघ्या ६ धावा देत ८ गडी बाद केले होते. त्या डावातील त्यांचे ३८ धावा देऊन, घेतलेले ८ बळी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन राहिले. १९६३ च्या इंग्लंड दौऱ्यावर देखील त्यांनी २६ बळी मिळवले होते.
१९६४ मध्ये, डरहॅम लीगमध्ये खेळण्यासाठी त्यांनी १,००० पाऊंड इतकी रक्कम घेतली. रकमेचा परतावा प्रदर्शनाने देत, १२६ बळी घेत त्यांनी व्हिटबर्न संघाला विजेतेपद मिळवून दिले. वयाच्या ३७ व्या वर्षी, वार्विकशायरसाठी खेळताना त्यांनी एका काउंटी हंगामात १३१ बळी मिळवले. दुसऱ्या स्थानी असलेल्या, पीटर सन्सबरी यांनी गिब्स यांच्यापेक्षा २४ बळी कमी घेतले होते. गिब्स यांच्या कामगिरीमुळे त्यांना त्यावर्षीचा ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. ऍलन स्मिथ यांनी, गिब्स यांचे कौतुक करताना म्हटले होते की, “क्रिकेट जरी सांघिक खेळ असला तरी, वार्विकशायर म्हणजेच गिब्स.”
जन्मापासूनच काही अधिक लांब असलेली त्यांची बोटे, त्यांच्या गोलंदाजीला धार आणत. त्या बोटांचा सुरेख वापर करत, गिब्स बेधडकपणे चेंडूला उंची देत व फलंदाजांना चकवत. गिब्स यांनी आपल्या कारकीर्दीत ७९ कसोटी सामन्यात ३०९ बळी मिळवले. फ्रेडी ट्रूमन यांच्यानंतर ३०० बळींचा टप्पा गाठणारे केवळ दुसरे तर पहिले फिरकी गोलंदाज होते. गिब्स यांचा इकॉनॉमी रेट हा दोन धावांपेक्षा कमी होता.
गिब्स यांच्या निवृत्तीनंतर, जॉर्जटाऊन येथील ‘आलमंड स्ट्रीट’ या रस्त्याला गिब्स यांचे नाव देण्यात आले. आयसीसीने देखील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा समावेश ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ मध्ये केला.
वाचा- मुंबईने टीम इंडियाला दिलेला ‘हा’ अवलिया फलंदाज, ज्याने तब्बल ५ रणजी संघाचं केलं होतं प्रतिनिधित्व