पुणे, २१ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचे तिसरे पर्व अंतिम टप्प्यात आले असून या स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी, २२ जून २०२५ रोजी सायं ७ वाजता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रंगणार आहे. तत्पूर्वी, स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भव्य असा लाईट शो, हेलियम बलून शो, व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तसेच, अंतिम सामना देखील प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे.
याआधी ईगल नाशिक टायटन्सने क्वालिफायर १ सामन्यात ४एस पुणेरी बाप्पा वर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवत दणक्यात अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात नाशिकचा कर्णधार प्रशांत सोळंकीने २३ धावात ३ बळी मिळवत शानदार कामगिरी केली होती. तर सलामीवीर मंदार भंडारीने अर्धशतक झळकावत नाशिकच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. यास्पर्धेत नाशिकने १० सामन्यात १३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. त्यांचा सामना ४एस पुणेरी बाप्पा व रायगड रॉयल्स यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा उस्फुर्तपणे पार पडली.
उत्कंठावर्धक अशा अंतिम लढतीत पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा अवघ्या एका धावेने थरारक विजय नोंदवत पहिले वहिले डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले होते. या विजयात संघाची कर्णधार अनुजा पाटीलचा अष्टपैलू कामगिरीचा मोठा वाटा होता.
एमपीएल स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स , रायगड रॉयल्स, ४एस पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या सहा संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. स्पर्धेतील आतापर्यंत ऑरेंज कॅपचा मानकरी रायगड रॉयल्सचा सिद्धेश वीर(३०९ धावा), तर पर्पल कॅपचा मानकरी ईगल नाशिक टायटन्सचा प्रशांत सोळंकी(१६ विकेट) आहे.