मुंबई। कबड्डीच्या एकापेक्षा एक स्पर्धांचे देखणे आणि दिमाखदार आयोजन करण्याचा लौकिक असलेल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा राज्य अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर “राजाभाऊ देसाई चषक” कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत दमदार चढाया-पकडींचा तुफानी खेळ करणाऱ्या 12 जिल्हा संघाचा थरार प्रभादेवीमातेच्या साक्षीने येत्या 10 ते 13 फेब्रूवारीदरम्यान चवन्नी गल्लीत रंगणार आहे.
गेली पन्नास वर्षे प्रभादेवीत राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करत कबड्डी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने याहीवेळी एक भन्नाट स्पर्धा आयोजित करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच मॅटवर उतरत असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली.
यंदा रत्नागिरीमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कबड्डीचा अनोखा संघर्ष पाहायला मिळाला होता. शेवटच्या चढाईवर यजमान रत्नागिरीने बलाढ्य मुंबई शहरवर मात करीत राज्य अजिंक्यपदावर प्रथमच आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला . त्याच दिग्गज संघांमध्ये पुन्हा एकदा झुंज मुंबईकर कबड्डीप्रेमींना पाहाता यावी म्हणून निवड चाचणीत खेळलेले अव्वल 12 संघ राजाभाऊ देसाई चषकासाठी भिडतील.
या स्पर्धेत अंतिम फेरीत लढलेल्या रत्नागिरी आणि मुंबई शहरसह मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सांगली, कोल्हापूर, बीड, धुळे, अहमदनगर हे तगडे संघही आपल्या जोरदार चढाया-पकडींचा खेळ दाखवतील, असेही सावंत यांनी सांगितले.
ही स्पर्धा राज्यस्तरीयच नव्हे तर राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या धर्तीवर खेळविली जाणार असल्यामुळे या स्पर्धेला प्रो कबड्डीला साजेसा लुक दिला जाणार आहे. त्यामुळे मॅटवर खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेला केवळ चकचकीतच नव्हे तर आकर्षकही केले जाणार असल्याचे स्पर्धेचे क्रीडाप्रमुख चंद्रशेखर राणे यांनी सांगितले.
स्वामी समर्थचा लौकिक आणि स्पर्धेची उतरणारे दिग्गज संघ यांच्यामुळे स्पर्धेला कबड्डीप्रेमींची अलोट गर्दी उसळणार हे निश्चित असल्यामुळे स्पर्धा केवळ एकाच क्रीडांगणावर खेळविली जाणार आहे आणि 2000 कबड्डीप्रेमींना थरार याची डोळा पाहता यावा म्हणून भव्य गॅलेरी उभारली जाणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.
तीन लाखांचा रोख बक्षीसांचा वर्षाव
स्पर्धेतील दिग्गज जिल्हा संघांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेत रोख रकमांचीही मोठी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्याला झळाळत्या संस्मरणीय चषकासह रोख 75 हजार रूपयांचे रोख इनाम दिले जाईल. स्पर्धेचा उपविजेता अर्ध्या लाखाचा मानकरी ठरेल तर उपांत्यफेरी पराभूत संघांना प्रत्येकी 25 हजार रूपये दिले जाणार आहेत.
याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम चढाईपटू, सर्वोत्तम पकडवीर तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूलाही आकर्षक पुरस्कार दिला जाणार असल्याचे माहिती महेश सावंत यांनी दिली. एवढेच नव्हे तर या बक्षीस रकमांमध्ये वाढ करण्याचाही आमचा मानस असल्याचेही सावंत म्हणाले.