आयपीएल सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत पण अजुनही युवराज सिंग काही खास करु शकलेला नाहीये. त्यामुळे सध्या तो फिटनेस व फाॅर्ममुळे टिकाकारांचे लक्ष्य झाला आहे.
त्याने आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात केवळ 36 धावा केल्या आहेत. युवराज सिंगच्या याच प्रर्दशनाविषयी बोलताना भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर म्हणाले की, “युवराज सिंगने आता त्याच्या खेळाविषयी व त्याच्या पुढील कारकिर्दीविषयी गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे.”
आगरकर एका क्रिकेट कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “युवराज सिंगच्या आतापर्यंतच्या खेळाने मी खुप निराश झालो आहे. त्याला वेगवान गोलंदाजाना खेळताना देखील त्रास होत होता. राॅयल चॅलेंजर बॅंगलोर विरुध्दच्या सामन्यात देखील उमेश यादव समोर खेळताना देखील त्याला अवघड जात होते.”
आगरकर म्हणाले की, “पंजाबच्या संघाला युवराज सिंगवर विश्वास आहे; पण पंजाबचा संघ आणखी किती दिवस त्याच्यावर विश्वास ठेवणार हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही संघासाठी मधली फळी महत्वाची असते. जर सलामीचे खेळाडूंनी चांगली सुरूवात दिली तर ती शेवटपर्यंत टिकून ठेवण्याची जबाबदारी मधल्या फळीवर असते. पंजाबच्या संघासाठी युवराज सिंगची भुमिका महत्त्वपुर्ण आहे. त्यामुळे युवराज सिंगने आता त्याच्या नावाप्रमाणे खेळी करणे गरजेचे आहे.”
आयपीएलच्या 11व्या मोसमात युवराज सिंगला शेवटच्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबने 2 कोटी रुपयांना खरेदी केले होते.