इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या युएई टप्प्यातील तिसरा डबल हेडर मंगळवार रोजी (२८ सप्टेंबर) पार पडला. यातील पहिला सामना दुपारी शारजाहच्या मैदानावर झाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या या सामन्यात कोलकाताने दिल्लीवर ३ विकेट्सने सोपा विजय मिळवला. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अबु धाबीच्या मैदानावर पार पडला. सलग ३ पराभवांनंतर पंजाबवर ६ विकेट्सने मात करत मुंबईने त्यांचे विजयाचे खाते उघडले. या डबल हेडरनंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.
प्लेऑफ शर्यतीत आघाडीवर असलेल्या दिल्लीला कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकत दिल्ली संघ १६ गुणांसह या स्थानावर आहे. तर कोलकाता संघाला या विजयाने भरपूर फायदा झाला आहे. ११ सामन्यांतील हा पाचवा विजय नोंदवत त्यांच्या खात्यात १० गुण जमा झाले आहे. यासह त्यांनी आपले चौथे स्थान कायम ठेवले आहे.
मात्र कोलकाताच्या विजयामुळे मुंबईच्या गुणतालिकेत टॉप-४ मध्ये जागा मिळवण्याच्या संधीवर पाणी फेरले गेले आहे. मुंबईने पंजाबवर विजय मिळवत आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांतील पाचवा विजय नोंदवत कोलकाताच्या बरोबरीने १० गुणांची कमाई केली. परंतु त्यांचा नेट रन रेट (-०.४५३) कोलकातापेक्षा (+०.३६३) कमी असल्याने त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागलेला पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे.
उर्वरित संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सर्वाधिक १६ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तिसऱ्या स्थानावरील आपला दबदबा कायम राखला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ सातव्या स्थानावर घसरला आहे आणि गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेला संघ सनरायझर्स हैदराबाद त्याचस्थानी कायम आहे.
असे अंतिम सामन्यात पोहोचतात संघ
हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुणतालिकेत पहिल्या २ स्थानांवर असलेल्या संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळला जातो. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात धडक मारतो. तर पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळते. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये इलिमिनेटर सामना होतो. यातील पराभूत झालेला संघ स्पर्धेतून बाहेर पडतो. तर विजयी संघाचा पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघाशी सामना रंगतो, याला दुसरा क्वालिफायर सामना असे म्हटले जाते. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतो.
अशी आहे गुणतालिका-
१. चेन्नई सुपर किंग्ज- १० सामने, ८ विजय, २ पराभव, १६ गुण
२. दिल्ली कॅपिटल्स- ११ सामने, ८ विजय, ३ पराभव, १६ गुण
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- १० सामने, ६ विजय, ४ पराभव, १२ गुण
४. कोलकाता नाईट रायडर्स- ११ सामने, ५ विजय, ६ पराभव, १० गुण
५. मुंबई इंडियन्स- ११ सामने, ५ विजय, ६ पराभव, १० गुण
६. पंजाब किंग्ज- ११ सामने, ४ विजय, ७ पराभव, ८ गुण
७. राजस्थान रॉयल्स- १० सामने, ४ विजय, ६ पराभव, ८ गुण
८. सनरायझर्स हैदराबाग- १० सामने, २ विजय, ८ पराभव, ४ गुण
महत्त्वाच्या बातम्या-
अरर! स्वतःचीच यष्टी उखडून फलंदाज विचित्र पद्धतीने बाद, व्हिडिओ बघून व्हाल लोटपोट
टीम इंडियाला पुन्हा मिळणार परदेशी प्रशिक्षक, अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर!