7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) संयुक्तपणे टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. मात्र, 22 जानेवारी रोजी बांगलादेशने भारतात येऊन वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे बांगलादेश आगामी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, जर बांगलादेशप्रमाणे पाकिस्ताननेही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, तर त्याचा स्पर्धेवर काय परिणाम होईल?
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने बांगलादेश आणि पाकिस्तानच्या भूमिकेवर आपले मत मांडले आहे. ‘आयएएनएस’ (IANS) या वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, जर बांगलादेशने खेळण्यास नकार दिला, तर त्याने फारसा काही फरक पडणार नाही. जर पाकिस्तानही बहिष्काराचा विचार करत असेल, तर त्यांनी खुशाल तसे करावे. वर्ल्ड कप तर होणारच. आज जागतिक क्रिकेटमध्ये बांगलादेश किंवा पाकिस्तानपेक्षा कितीतरी सरस संघ उपलब्ध आहेत. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडसारखा संघ खेळू शकतो. जगात कोणालाही कोणाशी फरक पडत नाही.
कनेरिया पुढे म्हणाला की, आयसीसीने नियमानुसार बांगलादेशशी चर्चा केली आहे. आयसीसी क्रिकेट चालवण्यासाठी विविध देशांच्या क्रिकेट बोर्डांना पैसे देते. दानिशच्या मते, जर पाकिस्तानने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला किंवा इतर कोणत्याही देशाने या मोठ्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला, तर त्याने आयसीसीचे काहीही नुकसान होणार नाही. कारण आयसीसीकडे अशा अनेक संघ आहेत जे वर्ल्ड कप खेळण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.






