आयपीएल 2025 मधील 53वा सामना रविवारी (4 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान राॅयल्स (KKR vs RR) संघात खेळला गेला. या सामन्यात रियान परागने (Riyan Parag) धमाकेदार खेळी केली. रियान राजस्थानच्या संघातील स्टार फलंदाजांपैकी एक आहे. केकेआरविरुद्ध त्याने 95 धावांची धमाकेदार खेळी केली, पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात तो चर्चेचा विषय बनला कारण त्याच्या बॅटवर स्टिकर नव्हता. परागने भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे, तो एक चांगला खेळाडू आहे, तरीही त्याच्या बॅटवर स्टिकर नाही. चला तर मग या बातमीद्वारे आपण यामागचे कारण जाणून घेऊया.
राजस्थान रॉयल्सला 207 धावांचे लक्ष्य गाठायचे असताना, रियान परागने 45 चेंडूत 95 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 6 चौकारांसह खणखणती 8 षटकार ठोकले. यंदाच्या आयपीएल त्याने 12 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 377 धावा केल्या आहेत.
परागच्या बॅटवर स्टिकर का नव्हता?
रियान परागच्या (Riyan Parag) बॅटवर स्टिकर नाही कारण त्याच्याकडे कोणताही स्पाॅन्सर नाही. बॅटसाठी स्पाॅन्सर मिळणे हे अनेक पैलूंवर अवलंबून असते. त्या खेळाडूचे जागतिक चाहते किती आहेत हे पाहिले जाते, तर तो खेळाडू संघाची ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यात काय योगदान देतो हे देखील महत्त्वाचे असते. तो खेळाडू भविष्यात एक चांगला खेळाडू बनण्यास सक्षम आहे की नाही हे देखील महत्त्वाचे असते. केकेआर विरुद्धच्या सामन्यात खेळलेला हा डाव परागची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या होती.






