आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्याधीश बनले. काही अपरिचित खेळाडूंना या लिलावात चांगली रक्कम मिळाली. या लिलावात एकूण २३ खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. या खेळाडूंपैकी काही खेळाडूंवर हे त्या रकमेला किती न्याय देऊ शकतात याविषयी साशंकता निर्माण झाली आहेत.
आज आपण अशाच चार खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना कोट्यावधी रुपयांची बोली लागली असली तरी त्यांच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
१) झाय रिचर्डसन
नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये झाय रिचर्डसनने १७ सामन्यांत २९ बळी मिळवले होते. मात्र, ही कामगिरी आयपीएलमध्ये इतक्या मोठ्या बोलीसाठी पुरेशी आहे का? हा मोठा प्रश्न आहे. रिचर्डसनने ऑस्ट्रेलियाकडून फक्त २ कसोटी सामने, १३ वनडे सामने आणि ९ टी२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याला फारसा अनुभव नाही. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत जगातील मोठे गोलंदाज अनेकदा महागडे ठरतात. अशा परिस्थितीत रिचर्डसनला पंजाबने दिलेली १४ कोटींची रक्कम जास्त तर नाही ना प्रश्न निर्माण होतो.
२) रायली मरडीथ
झाय रिचर्डसनप्रमाणेच पंजाब किंग्स संघाने ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज रायली मरडीथ याला देखील ८ कोटी रुपयांत खरेदी केले. मरडीथ आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एकही सामना खेळला नाही. बिग बॅश लीगमध्ये तो होबार्ट हरीकेन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. पंचवीस वर्षीय मरडीथने बिग बॅशमध्ये आतापर्यंत ३४ सामने खेळताना ४३ बळी मिळवले आहेत. त्याच्या सारख्या युवा खेळाडूवर इतकी मोठी बोली लावून पंजाब संघाने मोठी जोखीम घेतल्याचे बोलले जात आहे.
३) कृष्णप्पा गौतम
कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याला ९.२५ कोटी रुपयांना खरेदी करत चेन्नई सुपर किंग्स संघाने सर्वांना आवाक केले. यापूर्वी गौतमने राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, काही मोजके सामने सोडल्यास तो आपली छाप पाडण्यात पूर्णतः अपयशी ठरला. मागील हंगामात तर त्याला अवघा एक बळी मिळवत आला होता. त्यानंतरही, सीएसकेने इतकी मोठी बोली लावल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
४) टॉम करन
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनदेखील या लिलावात कोट्याधीश बनला. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर ५.२५ कोटी रुपयांची बोली लावली. वेगवान गोलंदाज व उपयुक्त फलंदाज म्हणून तो प्रसिद्ध आहे. मागील हंगामात तो राजस्थान रॉयल्ससाठी खेळला होता. त्यामध्ये त्याने ५ सामने खेळताना ८३ धावा ३ बळी मिळवले होते. दिल्ली संघात अनेक वरिष्ठ विदेशी खेळाडू असल्याने करनला कितपत संधी मिळेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-