भारत आणि इंग्लंड या उभय संघातील कसोटी मालिका भारताने ३-१ ने जिंकली आहे. या मालिकेनंतर १२ ते २० मार्च या कालावधीत दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे सर्व सामने होणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या मालिकेसाठी टी२० संघ घोषित केला आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत या दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या अनकॅप खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
भारतात होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक २०२१ च्या पुर्वतयारीच्या दृष्टीने भारतीय संघ निवड केलेल्या सर्व खेळाडूंना आजमावण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून कोणता खेळाडू कशा फॉर्ममध्ये आहे, हे समजेल. तसे तर, भारतीय टी२० संघात एकाहून-एक वरचढ फलंदाज उपलब्ध आहेत. परंतु त्यातील काही फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून ते येत्या टी२० मालिकेत दमदार फलंदाजी करताना दिसू शकतात. त्याच फलंदाजांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करू शकणारे तीन भारतीय फलंदाज
१. केएल राहुल –
केएल राहुल मागील काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याला भलेही कसोटी संघात स्थान मिळाले नाही. परंतु टी२० संघात त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तो भारताचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेत अर्धशतक झळकावत त्याने ८१ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर तो अजून चांगले प्रदर्शन करताना दिसेल. अशात तो टी२० मालिकेत सर्वाधिक धावांची नोंद करू शकतो.
२. विराट कोहली –
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. मागील काही काळापासून तो साधे शतकही करू शकलेला नाही. परंतु इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत तो धावांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
यापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीत विराटने सर्वाधिक धावा केल्या होत्या. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत ८५ धावांच्या सर्वोच्च वैयक्तिक खेळीसह तब्बल १३४ धावा केल्या होत्या. त्यामुळे टी२० क्रिकेटमधील हीच लय कायम राखत विराट इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करू शकतो.
३. सूर्यकुमार यादव –
मागील कित्येक वर्षांपासून भारतीय संघाचे दार ठोठावत असलेल्या सूर्यकुमार यादवला अखेर टी२० संघात जागा मिळाली आहे. त्याचे आयपीएल २०२० मधील दमदार प्रदर्शन आणि सध्या विजय हजारे ट्रॉफीतील जबरदस्त फॉर्म पाहता त्याला नक्कीच अंतिम एकादशमध्ये संधी दिली जाईल. सूर्यकुमारही संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी कसोटी क्रमवारी : आर अश्विनची तीन स्थानांनी प्रगती, तर ब्रॉड-अँडरसन यांची घसरण
झुंजार दीडशतकाचे रोहितला मिळाले फळ, कसोटी क्रमवारीत ‘या’ स्थानी मिळवला ताबा
युवा धुरंधरचा धुमाकूळ, षटकार-चौकारांसह विरोधकांची धोबीपछाड; ५९ चेंडूत केल्या १२८ धावा