क्रिकेट जगतात तसं पाहिलं तर पुरूष क्रिकेटमध्ये एका पेक्षा एक अविस्मरणीय विक्रम बनले आहेत. परंतु असे नाही, की विक्रम केवळ पुरुष क्रिकेटमध्येच बनतात. महिला क्रिकेटमध्येही अनेक विक्रम बनले आहेत. साधारणत: पुरूषांच्या तुलनेत महिला क्रिकेटचा चाहतावर्ग कमी आहे.
महिला क्रिकेटचा चाहतावर्ग कमी असल्यामुळे कदाचित क्रिकेटप्रेमींना त्यांनी केलेले विक्रम माहीत नसतील. परंतु महिला क्रिकेटमध्येही आतापर्यंत अनेक मोठ-मोठे विक्रम बनले आहेत. जे कदाचित कधीच न तुटण्यासारखे आहेत.
तसं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जो कोणताही विक्रम बनवणे किंवा मोडणे शक्य आहे. परंतु या लेखात आपण महिला क्रिकेटमधील त्या विक्रमांचा आढावा घेणार आहोत, जे मोडणे केवळ अशक्य असल्याचे दिसते.
महिला क्रिकेटपटूंनी केलेले ते ५ विक्रम जे मोडणे केवळ अशक्य- These 5 Never Ending Records are Made in Womens Cricket
५. सर्वात कमी वयात शतक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक बनवण्याचा विक्रम खूप महत्त्वाचा असतो. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) हा विक्रम १९९७ साली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना आपल्या नावावर केला होता. त्याने १६ वर्षे २१७ दिवस इतके वय असताना शतक पूर्ण केले होते.
या शतकी खेळीनंतर आफ्रिदी सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज बनला. परंतु भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू मिताली राजने (Mitali Raj) १९९९मध्ये केवळ १६ वर्षे २०५ दिवस इतके वय असताना आफ्रिदीचा कमी वयात शतक करण्याचा विक्रम मोडला होता. राज आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात ११४ धावांची खेळी करत सर्वात कमी वयात शतक करणारी क्रिकेटपटू बनली होती.
४. वनडेत द्विशतक करणारी सर्वात युवा फलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक द्विशतके करण्यात आली आहेत. वनडेत द्विशतक करण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा रोहित शर्मा (Rohit Sharma) अव्वल आहे. त्याने एक किंवा दोन वेळा नाही, तर तब्बल ३ वेळा द्विशतक ठोकले आहे. याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, मार्टिन गप्टील या खेळाडूंनीही द्विशतक ठोकले आहे.
परंतु जेव्हा सर्वात कमी वयात द्विशतक करणाऱ्या वनडे खेळाडूची चर्चा होते, तेव्हा न्यूझीलंडची महिला फलंदाज अमेलिया केरचे (Amelia Kerr) नाव येते.
केरने २०१८मध्ये आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात नाबाद २३२ धावांची खेळी केली होती. जेव्हा केरने हे द्विशतक ठोकले होते, तेव्हा तिचे वय केवळ १७ वर्षे आणि २४३ दिवस इतके होते. अशाप्रकारे ती वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली.
३. सर्वाधिक वय असणारी वनडे खेळाडू
क्रिकेटमध्ये तसं पाहिलं तर खेळाडू ४० व्या वयापर्यंत आपल्या कारकीर्दीचा निरोप घेतात. परंतु असेही काही खेळाडू आहेत, जे ४० वय पूर्ण केल्यानंतरही सातत्याने क्रिकेट खेळत असतात. काही खेळाडू तर असे आहेत, ज्यांनी ४५ वय पूर्ण केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.
सर्वाधिक वयात वनडे क्रिकेट खेळण्याच्या विक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं, तर त्यामध्ये वेस्ट इंडीज संघाची महिला खेळाडू नोलन क्लार्कचे (Nolan Clarke) नाव येते. क्लार्कने ४७ वर्षे आणि २५७ दिवस इतक्या वय असताना वनडे सामना खेळत सर्वाधिक वयात क्रिकेट खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यांचे वय सध्या ६३ असून त्या सध्याही वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.
२. एका डावात सर्वाधिक टक्केवारीने संघासाठी मोठे योगदान
क्रिकेट सामन्यात असे अनेकवेळा पहायला मिळाले आहे, की कोणताही संघ एखाद्यावेळी गोलंदाजांसमोर अधिक टिकत नाही. परंतु त्या संघातील एक खेळाडू मोठी खेळी करत संघासाठी मोठी धावसंख्या उभी करतो. म्हणजेच तो खेळाडू एकट्याच्या जोरावर मोठी खेळी करण्याचा कारनामा करतो.
असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकवेळा झाले आहे. परंतु इंग्लंडची महिला खेळाडू एनिड बॅकवेलने (Enid Bakewell) आपल्या संघाच्या डावातील टक्केवारीच्या आधारावर सर्वाधिक योगदान दिले आहे. बॅकवेलने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना इंग्लंडच्या १६४ धावांमध्ये नाबाद ११२ धावांची खेळी खेळत संघाच्या धावसंख्येत ६८.२९ टक्के योगदान दिले होते.
१. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलग सामन्यात कमीतकमी एक विकेट
भारतीय महिला क्रिकेट संघाची महिला गोलंदाज राधा यादवने (Radha Yadav) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यादवने टी२०त अशी कमाल केली आहे, जो कोणत्याही पुरूष क्रिकेटपटूला नाही जमले तसेच, महिला क्रिकेटपटूमध्येही कोणाला जमले नाही. तो विक्रम म्हणजेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट कारकिर्दीत खेळलेल्या सर्व सामन्यात किमान १ तरी विकेट घेणे
यादवने २४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १ विकेट तरी प्रत्येक सामन्यात घेतली आहे. हा एक मोठा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मेगन शटने (Megan Schutt) अशी कमाल २३ सामन्यांमध्ये केली आहे.






