आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात मागच्या वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. मुंबईला दुसऱ्या टप्प्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या तिन्ही सामन्यात पराभव मिळाला आहे. त्यांनी सध्या हंगामातील १० सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत सातव्या स्थानावर विराजमान आहेत. मुंबईने जर अजून एक सामना गमावला, तर त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता फारच कमी असेल. आयपीएलच्या इतिहासात पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडिन्सला दुसऱ्या टप्प्यात अचानक काय झाले आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या लेखात आपण त्यामागची कारणे जाणून घेणार आहोत.
टी-२० विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात मुंबई इंडियन्समधील बऱ्याच खेळाडूंना संधी दिली गेली असली, तरीही आयपीएलमध्ये हे खेळाडू कमाल करताना दिसत नाहीत. मुंबईच्या खराब प्रदर्शनाचे मुख्य कारण शोधायचे झाल्यास ते आरसीबीविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात स्पष्टपणे दिसले आहे. मुंबईच्या मध्यक्रमातील फलंदाज या सामन्यात संघासाठी काहीच योगदान देऊ शकले नाहीत.
या सामन्यात मुंबईची सलामीवीर जोडी वगळता बाकी सर्व फलंदाज अपयशी ठरलेले पाहायला मिळाले. विशेषत: सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन. हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या टप्प्यात अजूनपर्यंत संघासाठी अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. सूर्यकुमारने दुसऱ्या टप्प्यात ३, ५ आणि ८ अशा धावा केल्या आहेत, तर ईशान किशनने ११, १४ आणि ९ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार आणि ईशान किशनचे खराब प्रदर्शन
मुंबईच्या खराब प्रदर्शनाचे सर्वात मोठे कारण या दोघांचा खराब फॉर्म आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी काॅक संघाला चांगली सुरुवात देत आहेत. मात्र, त्यांच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला सलामीवीरांनी केलेली चांगली सुरुवात पुढे कायम ठेवता आलेली नाही.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही तसेच झाले सलमीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली होती, पण त्यांच्यानंतर मुंबईचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. ५७ धावांवर संघाने एकही विकेट गमावली नव्हती, पण पुढे १११ धावांवर संघ सर्वबाद झाला. सूर्यकुमारने या सामन्यात ८ आणि ईशान किशनने ९ धावा केल्या.
संघाची खालची फळीही ठरली आहे अपयशी
मध्यक्रमाप्रमाणेच खालच्या फळीतील फलंदाजांनीही अपेक्षित योगदान दिलेले नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दिसले आहे की, मुंबईचे तळातले पाच फलंदाजांनी एकूण पाच धावा केल्या आहेत. यापूर्वी केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईच्या सलामीवीरांनी ७८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यातही रोहित बाद होताच मुंबईचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. संघाने पुढच्या ६४ चेंडूत केवळ ७७ धावा केल्या आणि केकेआरने १५६ धावांचे आव्हान केवळ ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले होते.
हार्दिक पांड्याच्या फिटनेसविषयीच्या तक्रारी
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट नसल्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. तो दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यात खेळला नाही. आरसीबीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हममध्ये संधी दिली गेली, पण या सामन्यात पांड्याने एकही चेंडू टाकला नाही. फलंदाजीमध्ये त्याने केवळ तीन धावा केल्या. अष्टपैलू असल्यामुळे त्याने संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये योगदान देणे गरजेचे आहे. त्याच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांच्यावरील दबाव वाढला आहे आणि त्यामुळेच त्यांनाही चांगले प्रदर्शन करता आले नाही.
आक्रमक क्रिकेट खेळण्यामध्ये संघाला अपयश
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स संघ आक्रमक क्रिकेट खेळताना दिलसा नाही. हे देखील संघाच्या खराब प्रदर्शनाचे एक प्रमुख कारण आहे. संघाचा संचालक जहीर खानने आरसीबीविरुद्ध सामना गमावल्यानंतर या गोष्टीची पुष्टी केली आहे. त्याने सांगितले आहे की, “दुबईची खेळपट्टी चांगली होती. या खेळपट्टीवर आरसीबीने १६५ धावा केल्या आहेत आणि आम्हीही चांगली सुरुवात केली होती. मात्र, आमचा मध्यक्रम उद्ध्वस्त झाला. आम्ही आक्रमक क्रिकेट खेळता येत नाहीये. जर तुम्ही चांगल्या सुरुवातीनंतरही लवकर-लवकर विकेट्स गमावले, तर सामन्यात पुनरागमन शक्य नाही. आम्ही तुकड्यांमध्ये चांगले खेळत आहोत.”
मुंबई इंडियन्सला त्यांचा पुढचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात जर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, तर संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळवणे खूप कठीण असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पत्ता होणार का कट? ‘करा वा मरा’च्या स्थितीत अडकले ४ सामने
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच