टी20 विश्वचषक 2022 या स्पर्धेचा शेवट रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) झाला. इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांमध्ये अंतिम सामना खेळला गेला. या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान संघावर विजय मिळवला. त्याचबरोबर या स्पर्धेत काही फलंदाजांनी वर्चस्व गाजवले असून त्यांच्या संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा त्यांनी उचलला. टी20 विश्वचषकाच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांच्या कामगिरीबद्दल आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.
5. कुसल मेंडिस
श्रीलंंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिस (Kusal Mendis) हा टी20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5व्या स्थानी आहे. या टी20 विश्वचषकात खेळलेल्या 8 सामन्यात 31.85च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात त्याने 2 अर्धशतकेही लगावली, ज्यात त्याची 79 धावांची खेळी उच्चांकी खेळी देखील सामील आहेे.
4. सूर्यकुमार यादव
भारताचा उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या यादीत चौथ्या स्थानावर आहे. सूर्याने या विश्वचषकात भारतासाठी महत्वपूर्ण डाव खेळले असून भारताच्या मधल्या फळीला बळ दिले आहे. त्याने या विश्वचषकात खेळलेल्या 6 सामन्यात 59.75 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व धावा त्याने 189 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. सूर्याने या विश्वचषकात 3 अर्धशतके केली आहेत.
3. मॅक्स ओ’डौड
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेदरलँड्स संघाच्या मॅक्स ओ’डाउड (Max O’Dowd) याने तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने या विश्वचषकात 8 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 39.75 च्या सरासरीने 242 धावा केल्या आहेत. नेदरलँड्स संघाने या विश्वचषकात चांगले प्रदर्शन केले असून त्यांच्या विजयात मॅक्सचे महत्वाचेे योगदान आहे.
2. जोस बटलर
टी20 विश्वचषक 2022 इंग्लंड संघाने जिंकला असून या विजयामध्ये कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याचे महत्वाचे योगदान आहे. त्याने या विश्वचषकात खेळलेल्या 7 सामन्यात 251 धावा केल्या, ज्यामुळे तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
1. विराट कोहली
टी20 विश्वचषक 2022 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) याने भारतासाठी खोऱ्याने धावा ओढल्या असून भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात त्याचे विशेष योगदान होते. या विश्वचषकात खेळलेल्या 6 सामन्यात त्याने 98.66च्या सरासरीने 296 धावा चोपल्या आणि टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला. त्यात त्याची पाकिस्तान विरूद्धची 82 धावांची खेळी महत्वपूर्ण होती. हा विश्वचषक सुरू होण्याआधी संघातील त्याच्या निवडीवर अनेक जणांनी प्रश्नचिन्हे निर्माण केलेली. मात्र, विश्वचषकात सर्वाधिक धावा करत कोहलीने त्यांची बोलती बंद केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीत बटलरचे ऐतिहासिक प्रदर्शन, खास यादीत मिळवला विराटनंतरचा क्रमांक