खरंतर क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. क्रिकेटचा खेळ जवळजवळ १४३ वर्षांपूर्वी सुरू झाला. १९७१ मध्ये कसोटी क्रिकेटपासून क्रिकेट खेळाला सुरुवात झाली आणि पुढे त्याचे वनडे क्रिकेट सुरु झाले. वनडे क्रिकेट बर्याच वर्षांपासून सुरु आहेच, परंतु त्यातही आता क्रिकेटला टी२० चे छोटे स्वरूप देण्यात आले आहे.
क्रिकेट क्षेत्रातील हे छोटे स्वरूप आता चाहत्यांच्या पसंतीचा क्रिकेट प्रकार झाला आहे. आज एकापेक्षा एक महान खेळाडू या टी२० क्रिकेट प्रकारात दिसतात. परंतु या खेळाडूंमध्ये मोजक्याच खेळाडूंना महान खेळाडू म्हणून ओळखले जाते. या लेखात ते ५ फलंदाज पाहूया की, जर ते टी२० क्रिकेटमध्ये काही वर्षे राहिले असते तर त्यांची गणना महान खेळाडूंमध्ये केली गेली असती.
सर विव रिचर्ड्स
वेस्ट इंडीज क्रिकेटमधील सर्वांत महान फलंदाजांपैकी एक म्हणजे विव रिचर्ड्स. रिचर्ड्स हे त्यांच्या काळातील सर्वात स्फोटक फलंदाज होते. ते ८० च्या दशकात अशी फलंदाजी करायचे की गोलंदाजांमध्ये भय स्पष्टपणे दिसून यायचे. विव रिचर्ड्स गोलंदाजांवर आपले अधिराज्य गाजवत. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विव रिचर्ड्स यांच्या काळात जर टी२० क्रिकेट असते, तर नक्कीच ते या टी२० प्रकारातही महान फलंदाज ठरले असते. पण, त्या काळात टी२० क्रिकेटचे नाव देखील माहित नव्हते.
रिकार्डो पॉवेल
सध्या वेस्ट इंडीज क्रिकेटमधील टी२० क्रिकेटच्या स्वरूपात असंख्य खेळाडू खेळत आहेत. पूर्वी विंडीजकडे असे काही फलंदाज होते की, आज त्यांनी टी२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व नक्की प्रस्थापित केले असते. त्या फलंदाजांपैकी एक म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज रिकार्डो पॉवेल. ब्रायन लाराच्या काळात वेस्ट इंडिज संघात खेळणारा रिकार्डो पॉवेल हा एक अत्यंत विस्फोटक फलंदाज मानला जात होता. परंतु, जेव्हा रिकार्डो पॉवेल याने निवृत्ती घेतली, त्यानंतर काही वर्षाने टी२० क्रिकेट सुरू झाले. त्याच्या काळात टी२० क्रिकेटचे प्रारूप असते तर तो आज एक टी२० दिग्गज म्हणून पुढे आला असता.
सनथ जयसूर्या
श्रीलंका क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सनथ जयसूर्या याने बरीच वर्ष श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाजाबद्दल बोलताना माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचे नाव प्रथम घेतले जाते. सनथ जयसूर्याने संपूर्ण कारकीर्दीत उत्तम फलंदाजी केली. सनथ जयसूर्या अत्यंत स्फोटक फलंदाजी करायचा. त्याची टी२० क्रिकेट कारकीर्द छोटीशी राहिली. मात्र, या छोट्या कारकिर्दीत तो चमकला होता. जयसूर्याने जास्त काळ टी-२० चे स्वरुप खेळले नाही. अन्यथा, तोदेखील टी२० च्या सर्वात्तम फलंदाजांपैकी एक मानला गेला असता.
लान्स क्लूसनर
दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी अष्टपैलू लान्स क्लूसनर त्याच्या काळात एक जबरदस्त खेळाडू राहिला आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपला ठसा उमटविला होता. क्लूसनरमध्ये ज्या प्रकारची आक्रमक खेळी खेळण्याची क्षमता होती, ती पाहता टी२० क्रिकेट प्रकारातील तो अत्यंत धोकादायक खेळाडू ठरला असता. क्लूसनरने दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला होता. त्यावेळी लान्स क्लूसनर टी२० क्रिकेटचा भाग असता तर, आज क्लूसनर टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून गणला गेला असता.
अजय जडेजा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा हा भारताचा एकेकाळचा सर्वोत्तम फिनिशर मानला जात. सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत, जोरदार फटकेबाजी करण्याची त्याची कला वादातीत होती. तसेच, तो एक चपळ क्षेत्ररक्षक मानला जात. मात्र, मॅच फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ऐन भरात असताना संपुष्टात आली. टी२० क्रिकेटचा उदय होण्याच्या अगदी काही वर्ष आधीच त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यामुळे, त्याला टी२० क्रिकेट खेळता आले नाही. १९९० नंतर टी२० क्रिकेट सुरू झाले असते तर, अजय जडेजा एक महान खेळाडू असता.